३१ डिसेंबरला देणार व्यसन विरोधी मानवी साखळीतून व्यसनमुक्तीची हाक


- राष्ट्रीय सेवा योजना आणि मुक्तिपथचा संयुक्त उपक्रम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
मावळत्या वर्षाची शेवटची रात्र आणि उगवत्या वर्षाचा पहिला दिवस दारू पिऊन साजरा करण्याचा प्रघात मोठ्याच नाही तर लहान लहान शहरांत आणि गावागावात दिसून येतो. या प्रकाराला छेद देत व्यसनमुक्त गडचिरोली जिल्ह्याच्या दिशेने पाउल टाकण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि मुक्तिपथच्या संयुक्त प्रयत्नांतून व्यसन विरोधी मानवी साखळीचे आयोजन सोमवार ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता गांधी चौकात करण्यात आले आहे. या अभियानात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन युवांना आणि नागरिकांना करण्यात येत आहे.
 सर्च, महाराष्ट्र शासन, टाटा ट्रस्ट आणि गडचिरोली जिल्ह्यातील जनता यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा व्यसनमुक्त करण्यासाठी मुक्तिपथ अभियान सुरु करण्यात आले. देशातील तरुणांच्या जीवावरच विकसित भारताचे स्वप्न पहिले जात असताना तो युवकच व्यसनाच्या आहारी जात आहे. आदिवासी बहुल गडचिरोली जिल्हाही याला अपवाद नाही. दारू पिऊन थर्टी फर्स्ट साजरी काराण्याचा प्रकार येथेही दिसून येतो. या प्रकाराला फाटा देत युवक युवतींनी व्यसनाविरोधात ठामपणे आणि एकजुटीने उभे राहण्यासाठी दारू व तंबाखूमुक्त गडचिरोली विकास कार्यकमांतर्गत व्यसन विरोधी मानवी साखळीचे आयोजन सोमवार ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता गांधी चौकात करण्यात आले आहे. रासेयो अंतर्गत येणाऱ्या गडचिरोली शहरातील सर्व महाविद्यालयीन युवक युवती यात सहभागी होणार आहे. व्यसन विरोधी साखळी रली, युवक-युवतींची उत्स्फूर्त भाषणे, व्यसन विरोधी सामुहिक शपथ, पोस्टर प्रदर्शन असे या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे. या व्यसन विरोधी मानवी साखळीत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ. नरेश मडावी आणि मुक्तिपथने केले आहे.

गावागावात व्यसनविरोधी कार्यक्रम व्हावा  

संपूर्ण जिल्हा दारू आणि व्यसनमुक्त करण्यासाठी राज्य शासन आणि मुक्तिपथ प्रयत्न करीत आहे. नव्या वर्षाचे स्वागत पूर्णपणे जागृतावस्थेत करून त्याचा आनंद घेण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे. स्वतःचे गाव, तालुका व्यसनमुक्त करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळा-महाविद्यलयात हा कार्यक्रम घेण्याचे आवाहन मुक्तिपथने केले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-29


Related Photos