मजुराची दगडाने ठेचून केली निर्घृण हत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
लकडगंज-कळमना भागात त्याची १५ वर्षांपूर्वी प्रचंड दहशत होती. मात्र सततच्या कारवाईमुळे त्याने गुन्हेगारी सोडली अन् मिळेल ते काम करून तो जगू लागला. मात्र. किरकोळ कारणावरून शुक्रवारी रात्री त्याच्यातील गुन्हेगार जागा झाला अन् या गुन्हेगाराने एका मजुराची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. पारडी चाैकात भल्या सकाळी शनिवारी ही घटना उघडकीस आली अन् त्यानंतरच्या घटनाक्रमातून गुन्हेगारी सोडलेल्या आरोपीची क्रूरताही पुढे आली. दामोदर मनोहरराव दासरथिवार (वय ४५) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
१५ वर्षांपूर्वी दामोदरची लकडगंज, शांतीनगर, पारडी, कळमना आणि आजूबाजूच्या भागात मोठी दहशत होती. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हेही दाखल आहेत. त्यावेळी पोलिसांनी विविध गुन्ह्यात कठोर कारवाई करून त्याची नांगी ठेचली. वारंवार पोलीस कोठडी आणि कारागृहात राहावे लागत असल्याने त्याने गुन्हेगारीपासून फारकत घेतली. अलीकडच्या काही वर्षांत मोलमजुरी करून तो गुजराण करू लागला. दिवसा कमवायचे, दारू प्यायची, मिळेल ते खायचे आणि जागा दिसेल तेथे झोपायचे, असा त्याचा दिनक्रम बनला. शुक्रवारी धुळवडीच्या दिवशी असेच झाले. त्याने रात्रीपर्यंत दारू ढोसली अन् पारडी चाैकातील एका मेडिकल स्टोअर्सच्या शटरसमोर झोपला. त्याच जागी सोनू कांशिराम बंसकर (वय ४०) गादी टाकून नेहमी रात्री झोपत होता. त्या जागी दामोदर झोपल्याचे पाहून सोनूने त्याला उठवले. 
यावेळी दोघांत वाद झाला. दोघेही दारूच्या नशेत टुन्न होते. एकमेकांना मारहाण केल्यानंतर दामोदर तेथून उठून बाजूच्या गिट्टीच्या ढिगाऱ्यावर जाऊन झोपला. गिट्टी अंगाला टोचत असल्याने त्याला काही झोप येत नव्हती. आपल्याला भर झोपेतून हाकलून लावल्याचा राग त्याच्या डोक्यात होता. पहाटे ५ च्या सुमारास त्याच्यातील गुन्हेगार जागा झाला. बाजूला पडून असलेले गट्टू (सिमेंटची वीट) उचलून त्याने सोनूला ठेचणे सुरू केले. १० ते १५ वेळा डोक्यावर वीट मारून सोनूला रक्ताच्या थारोळ्यात लोळवून आरोपी पळून गेला. दरम्यान, शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. मेडिकल स्टोअर्सच्या संचालकाने माहिती कळविताच पारडी पोलीस ठाण्याचा ताफा घटनास्थळी धावला. पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांच्यासह गुन्हे शाखेचाही ताफा पोहोचला.
अखेर ओळख पटली :
मृतक त्या भागात मोलमजुरी करून आपले पोट भरत होता. त्याचे नाव, गाव, पत्ता कुणाला माहीत नव्हता. ठिय्यावर मजुरी करणाऱ्या काही मजुरांसोबत तो बोलायचा, या माहितीवरून पोलिसांनी त्याची माहिती मिळवली. तो मूळचा ईटारसी मध्य प्रदेशमधील असल्याचे कळले. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस निरीक्षक मुकुंद साळुंखे, एपीआय रियाज मुलानी, संकेत चाैधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी दामोदरची माहिती काढली. तो पारडी नाका नंबर पाचमधील एका दारूच्या भट्टीवर असल्याचे कळताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या बांधल्या. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला पारडी पोलिसांच्या हवाली करण्यात आले.  Print


News - Nagpur | Posted : 2022-03-20
Related Photos