महत्वाच्या बातम्या

 आर्वी येथील रोजगार मेळाव्यात ३२७ उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड


- कंपन्याद्वारे १ हजार ५२७ पदांसाठी मुलाखती

- पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सहकार भवन, आर्वी येथे आयोजित पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात विविध नामवंत कंपन्यांच्यावतीने त्यांच्याकडील रिक्त तब्बल 1 हजार ५२७ पदांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. या मेळाव्याचे उद्घाटन आ. दादाराव केचे यांच्या हस्ते झाले.

उद्घाटनप्रसंगी आ.केचे यांच्यासह उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, कौशल्य विकासच्या सहाय्यक आयुक्त निता औघड, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य तुषार लोखंडे आदी उपस्थित होते. तरुणांना स्थानिक स्तरावरच रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आ.दादाराव केचे यांच्या पुढाकाराने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या रोजगार मेळाव्यावत आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होते, असे यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना आ. केचे यांनी सांगितले.

या मेळाव्यात आयसीआयसीआय स्कील फांऊडेशन नागपूर, सी-डेट बारुद कंपनी तळेगाव, धूत ट्रान्समिशन संभाजीनगर, निर्मल टेक्सटाईल कोंढाळी, पीपल ट्री कंपनी पुणे, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक नागपूर या नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रतिनिधींनी त्यांच्या कंपनीमधील रिक्त असलेल्या १ हजार ५२७ पदांकरीता उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यापैकी ३२७ उमेदवारांची प्राथमिक तर १७ उमेदवारांची अंतिम निवड केली.

या मेळाव्यात विविध शासकीय विभाग, महामंडळांचे स्वयंरोजगार व प्रशिक्षण देणा-या संस्थांनी देखील स्टॉल लावले होते. विविध योजनांची माहिती या स्टॉलवरुन देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत वानखेडे यांनी केले तर आभार निलेश देशमुख यांनी मानले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी धिरज मनोहर, अतुल वर्हेकर तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिक्षक, कर्मचा-यांनी सहकार्य केले असल्याचे कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्तांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos