हजारो कुणब्यांनी दणाणून सोडला जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर


- कुणबी महामोर्चाला पंचक्रोशितील नागरिकांची उपस्थिती
- जिल्हाधिकाऱ्यांनी दिले मागण्यांचे निवेदन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
कुणबी जातीचा एसईबीसी प्रवर्गात समावेश करावा व १६ टक्के आरक्षण लागू करावे, स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावा, शेतीमालाला हमीभाव देण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी आज २७ डिसेंबर रोजी कुणबी समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला होता. या महामोर्चात सहभागी हजारो कुणबी समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता.
या महामोर्चाचे नेतृत्व कुणबी समाजातील युवक, युवती, विद्यार्थी तसेच समाजातील ज्येष्ठ व्यक्तींनी केले. यावेळी  काॅंग्रेसचे किसान आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले, आ. परिणय फुके, आ. सुनिल केदार, खा. मधुकर कुकडे, महेंद्र ब्राम्हणवाडे आदी उपस्थित होते. 
स्थानिक शिवाजी महाविद्यालयापासून महामोर्चाला सुरूवात झाली. जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील ३० हजारच्या जवळपास कुणबी समाज बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. विविध घोषणा देत मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. या ठिकाणी विद्यार्थी, युवक, युवतींनी कुणबी समाजाचा आवाज बुलंद केला. जिल्हाधिकारी कार्यालयात शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेवून मागण्यांचे निवेदन सादर केले. 
- अतिशय शिस्तबध्द रित्या मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
कुणबी जातीचा समावेश एसईबीसी प्रवतार्गत करावा व १६ टक्के असरक्षण देण्यात यावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी जशाच्या तशा तत्काळ लागू कराव्यात, नोकर भरती संदर्भातील पेसा अंतर्गत महामहीम राज्यपालांनी निर्गमित केलेल्या अधिसुचनेत सुधारणा करून सर्व प्रवर्गातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे, कुणबी जातीच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतीगृहाची निर्मिती करून एससी, एसटी प्रमाणे सर्व अभ्यासक्रमांसाठी १०० टक्के शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात यावा, धानाला प्रती क्विंटल ४ हजार रूपये हमीभाव द्यावा, शासनाने गठीत केलेल्या जनजाती सल्लागार समितीचा अहवाल तत्काळ जाहिर करून निर्णयातील तरतूदीनुसार कार्यवाही करावी, कुणबी जातीला ऍट्रासिटी कायद्यांतर्गत संरक्षण द्यावे, कुणबी जातीतील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश आहे.  

मोर्चाची क्षणचित्रे 

- ‘जय कुणबी’ च्या गजराने रस्ते दुमदूमून निघाले.
- आजवरच्या मोर्चांच्या गर्दीचा विक्रम कुणबी महामोर्चाने मोडीत काढला.
- संपूर्ण मोर्चाप्रसंगी गडचिरोली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
- मोर्चाचे डोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केले जात होते. तसेच युट्युबवर लाईव्ह प्रक्षेपण केले जात होते.
- युवक, युवती विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. 
- मोर्चामध्ये शिवाजी महाराज, शेतकरी आदींची वेशभुषा धारण केलेले युवक विशेष लक्ष वेधून घेत होते.



  Print






News - Gadchiroli | Posted : 2018-12-27






Related Photos