‘ठाकरे’ च्या ३ मिनिटांच्या ट्रेलरने उपस्थितांना केले रोमांचित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
  २५ जानेवारीला प्रदर्शित होत असलेल्या   ‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर काल २६ डिसेंबर रोजी  वडाळा कार्निवल आयमॅक्स थिएटरमध्ये रिलीझ करण्यात आला. ट्रेलर प्रदर्शित होताच  ३ मिनिटांच्या   ट्रेलरने उपस्थितांना रोमांचित  केले . चित्रपट  कलाकार आणि सर्वच टीमने या चित्रपटासाठी जीव ओतून काम केले आहे. हा चित्रपट राज्यात आणि देशातच नव्हे तर परदेशातही सर्व विक्रम मोडीत काढेल, असा ठाम विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  व्यक्त केला. 
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनप्रवासावर आधारित या चित्रपटाच्या हिंदी आणि मराठी भाषेतील ट्रेलर तसेच पोस्टरचे  लाँचिंग करण्यात आले.   बाळासाहेबांचे दमदार संवाद एकामागून एक कानावर पडू लागताच प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरश: रोमांच उभे राहिले. प्रत्येक संवादाला प्रेक्षक शिट्टय़ा आणि टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद देत होते. बाळासाहेबांच्या भूमिकेतील अभिनेता नवाजुद्दीन सिद्धिकीला बघून प्रेक्षक भारावून गेले. ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’, ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’ अशा घोषणांनी थिएटर दुमदुमले. भारावलेल्या प्रेक्षकांनी ट्रेलरला ‘वन्स मोअर’ दिला.
जीव तोडून, जीव ओतून हा चित्रपट बनवला गेल्याने त्यात दम आहे, अशी प्रतिक्रिया ट्रेलर पाहिल्यानंतर व्यक्त करतानाच उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांनाही तुम्हाला ट्रेलर कसा वाटला, असा प्रश्न विचारला. त्या वेळी टाळ्या आणि घोषणांनी थिएटर दुमदुमले. सिनेमाच्या शूटिंग वेळी आपण अधूनमधून उपस्थित होतो, असे सांगत सिनेमातील मेकअप, प्रकाशयोजना उत्तम असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.   Print


News - Rajy | Posted : 2018-12-27


Related Photos