विदर्भात मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण कुणबी समाजाला लागू करा : आ. विजय वडेट्टीवार


- कुणबी समाजाला मराठा गृहीत धरून दिले आरक्षण
- कुणबी समाजाला डावलण्याचा सरकारचा प्रयत्न
- कुणबी महामोर्चा, आंदोलनाला दिला पाठींबा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: गट क आणि ड संवर्गाच्या भरतीमध्ये मराठा समाजाला संपूर्ण राज्यभरात १६ टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. मात्र या आरक्षणामुळे विदर्भातील कुणबी समाजावर अन्याय झाला असून मराठा समाजाला लागू केलेले १६ टक्के आरक्षण कुणबी समाजाला देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष, विधीमंडळाचे उपगटनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.
आ.वडेट्टीवार म्हणाले, माजी मुख्यमंत्री पंजाबराव देशमुख यांच्या सल्ल्यानुसार मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी संवर्गात समावेश करण्यात आला होता. ओबीसी समाजाला राज्यात १९ टक्के आरक्षण देण्यात आले होते. यामध्ये ३६८ जातींचा समावेश आहे. जिल्हानिहाय आरक्षण पाहिल्यास चंद्रपूर जिल्ह्यात ५३ हजार कुटूंब कुणबी समाजाचे आहे. तरीही ९ टक्के आरक्षण आहे.  तर गडचिरोली जिल्ह्यात ४३ ते ४४ टक्के ओबीसी समाज आहे. असे असतानाही केवळ ६ टक्के आरक्षण देण्यात आले आहे.  या दोन्ही जिल्ह्यात एक टक्कासुध्दा मराठा समाज नाही. असे असतानाही मराठा समाजाचे आरक्षण या जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आले आहे. मग हेच आरक्षण कुणबी समाजाला लागू करण्यात अडचणी काय? आरक्षण देताना कुणबी समाजाला मराठा दाखविण्यात आले. कुणबी समाजानेसुध्दा मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मदत केली. मात्र आता कुणबी समाजाकडेच दूर्लक्ष केले जात आहे, असेही आमदार वडेट्टीवार म्हणाले.
विदर्भात मराठा समाज नाही मग १६ टक्के आरक्षण कुणाला देणार याबाबत विचारणा केली असता मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी हे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी लागू केले जाईल, असे म्हटले होते. मात्र हे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी न देता कुणबी समाजालाच देण्यात यावे. कुणबी समाजाला गृहीत धरून आरक्षण देण्यात आले असल्यामुळे या १६ टक्के आरक्षणावर कुणबी समाजाचा हक्क आहे  आणि ही वस्तूस्थिती आहे. रानडे समितीने जी मराठा समाजाची आकडेवारी जाहिर केली होती ती कुणबी समाजाचीच होती. यामुळे सरकार केवळ कुणबी समाजावरच अन्याय करीत आहे, असाही आरोप आ. वडेट्टीवार यांनी केला आहे. एकीकडे मोठ्यांना मोठे करायचे आणि दुसरीकडे कुणबी समाजाचे आयुष्य उध्वस्त करायचे, असे धोरण सरकारने आखले आहे. याविरोधात आपण आवाज उठवू. कुणबी समाजाच्या मोर्चाला, आंदोलनाला सुध्दा काॅंग्रेस पक्षाचा पूर्ण पाठींबा आहे, असेही आ. वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. यावेळी जि.प. सदस्य अ‍ॅड.  राम मेश्राम, डाॅ. नितीन कोडवते उपस्थित होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-26


Related Photos