महत्वाच्या बातम्या

 अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या भरतीप्रक्रियेला स्थगिती : महिला, बालकल्याण आयुक्तांचे आदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : नगरसह राज्यात रिक्त असणाऱ्या अंगणवाडीसेविका, मिनी अंगणवाडीसेविका आणि मदतनीस यांच्या जागांसाठी सुरू असलेली भरतीप्रक्रियेला 27 मार्चला स्थगिती देण्यात आली आहे. महिला व बालकल्याण आयुक्त रुबल अग्रवाल यांनी हे आदेश काढले आहेत.

दरम्यान, राज्यात 4 हजार 509 अंगणवाडीसेविका, 626 मिनी अंगणवाडीसेविका आणि 15 हजार 466 मदतनीस अशा 20 हजार 601 जागा रिक्त होत्या. या सर्व रिक्त जागांसाठी महिला बालकल्याण विभागाने भरतीप्रक्रिया सुरू केली होती. मुंबई उच्च न्यायालयात अंगणवाडीसेविकांनी भरतीबाबत याचिका दाखल केली असून, त्यावर प्राथमिक सुनावणी झाली असून, पुढील सुनावणी 17 एप्रिलला होणार आहे. तोपर्यंत उच्च न्यायालयाने अंगणवाडीसेविका यांची भरती अथवा त्यांना कामावरून कमी करण्यास स्थगिती दिली आहे.

नगर जिह्यात अंगणवाडीसेविका, मिनी अंगणवाडीसेविका आणि मदतनीस यांची 822 पदे रिक्त होती. यासाठी भरतीप्रक्रिया सुरू होती. आधी या भरतीला जिल्हा परिषद कर्मचारी संपामुळे ग्रहण लागले होते. आता अंगणवाडी सेविकांच्या संघटनेने भरतीवर आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अंगणवाडी सेविका संघटनेची याचिका उच्च न्यायालयाने दाखल करून घेत पुढील सुनावणी 17 एप्रिलला ठेवली आहे. तोपर्यंत सर्व प्रक्रिया थांबवण्यास सांगितल्याने आता 17 एप्रिलपर्यंत अंगणवाडीसेविकांची भरती स्थगित राहणार असून, पुढील सुनावणीनंतर या भरतीची पुढील दिशा ठरणार आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos