समाजाला प्रथम प्राधान्य देऊन आपला मार्ग प्रशस्त करा : राज्यमंत्री ना. अम्ब्रीशराव आत्राम


- खैरी (तिर्री)  आदिवासी जनजागृती मेळावा  
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
  संघटित असलेला समाज हाच समृद्ध भारताचे स्वप्न पूर्ण करणार आहे.  आदिवासी समाज तर मूळ भारतीय संस्कृती जगणारा समाज आहे. तेव्हा संघटित राहून प्रगती पथावर जाणे अत्यावश्यक आहे. जर आपण संघटित राहिलो तरच आपली प्रगती शक्य आहे. त्यामुळेच कुठेतरी आज मी या पदावर काम करतो आहे. आदिवासी विभागाला आतापर्यंतचा सर्वात मोठा वाटा अर्थसंकल्पात  आपण मागच्या चार वर्षात दिला आहे. माझ्या वतीने समाजासाठी माझ्याने होईल तेवढं करण्यासाठी सदैव तत्पर असतो. कारण समाजासाठी काम करणे हे भाग्याचं काम आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास , वन राज्यमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांनी केले. 
आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्हा पालकमंत्री  ना. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली  २२ डिसेंबर  रोजी भंडारा जिल्ह्यातील मौजा खैरी (तिर्री) या गावी आदिवासी जनजागृती मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. नवदुर्गा आदिवासी महिला मंडळ व जय बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने 'आदिवासी जनजागृती मेळावा' व भारतीय संविधान पुस्तकांचे वाटप समारंभाचे आयोजन करण्यात आले. शाळकरी मुलांनी सादर केलेल्या आदिवासी नृत्यांमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. २२ व २३ डिसेंबर या दोन दिवस चालणाऱ्या या मेळाव्यात आदिवासींच्या विविध लोकोपयोगी प्रश्नांवर चर्चा - विमर्श करण्यात आले. 
ना. आत्राम  पुढे म्हणाले, आदिवासी विकासासाठी कुठलीही समस्या जर ती पूर्ण होणार नसेल तर ती माझ्याकडे घेऊन यावी. २०१९ पर्यंत कोणताही आदिवासी घरकुल विना राहता कामा नये. आदिवासी समाजातील युवकांनी अधिकारी व्हायला पाहिजे, असे जीवन ध्येय ठेवूनच भविष्यातील वाटचाल करावी व त्यातून आपल्या समाजाला लाभ मिळवून द्यावा. आदिवासी युवक हे नैसर्गीकरित्या शारीरिक क्षमतेने ओतप्रोत आहेत. त्यासाठी त्यांनी खेळाच्या क्षेत्रात पुढे येणे आवश्यक आहे. आदिवासी युवकाने कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड बाळगू नये. आपण आदिवासी विकास विभागांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग आणल्यामुळे इथून पुढे विविध ठिकाणच्या प्रलंबित आश्रमशाळांची कामे लवकरच मार्गी लागतील. साकोली येथे १ कोटींचे समाजभवन बांधण्यासाठी तसेच तुमसर येथे आदिवासी वसतिगृह अश्या विविध ठिकानची कामे काही दिवसांतच पूर्ण होतील, अशी ग्वाही देतो , असेही ना. आत्राम म्हणाले. 
यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आर. पी. अवसरे, भाजपा आदिवासी आघाडी अध्यक्ष बी. एस. सयाम, आदिवासी सेवक दामोदर वाढवे, तहसीलदार कोकुडे आदी मान्यवरांसह बाल, युवक, महिला, आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.   Print


News - Bhandara | Posted : 2018-12-24


Related Photos