महत्वाच्या बातम्या

 कॉलेजची फक्त पाटी, प्रत्यक्षात परीक्षा केंद्र २२ कि.मी. दूरच्या शाळेत : गैरप्रकार भरारी पथकाने आणला उघडकीस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कन्नड तालुक्यातील परीक्षा केंद्रच हरवले आहे. कोळवाडी गावातील स्वर्गीय गोविंदराव जिवरख कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय असे त्या केंद्राचे नाव आहे. विद्यापीठाचे भरारी पथक ३१ मार्चला तिथे गेले तर एका छोट्या खोलीला कॉलेजचा बोर्ड दिसला. परीक्षा मात्र अतिशय गुप्तपणे २२ कि.मी. अंतरावरील औराळा गावाच्या शाळेत घेतली जात असल्याचे गावकऱ्यांनी पथकाला सांगितले. 

धक्कादायक बाब म्हणजे विद्यापीठाला कळू नये, म्हणून कोळवाडीत प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून औराळ्याला व्हॉट्स ॲप केली जाते होती.

तीन प्राध्यापकांचे भरारी पथक शुक्रवारी दुपारी १२:०० ते ०१:०० च्या दरम्यान कोळवाडीत पोहोचले. एक हजार लोकसंख्येच्या या गावात माध्यमिक शाळाही नाही. पण शासनाच्या दबावात विद्यापीठाने कॉलेज दिले आहे. राधा-गोविंदा शिक्षण प्रसारक मंडळाचे जिवरख कॉलेज आहे. विद्यापीठाने मागील वर्षी कॉलेज नाकारले असताना तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या आग्रहामुळे कॉलेज दिले. शुक्रवारी बीए, बीकॉम, बीएस्सीच्या ९७ विद्यार्थ्यांची परीक्षा होती. भरारी पथकाला परीक्षा केंद्रच सापडले नाही. गावात फक्त पाटी आहे, पण कॉलेज नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

संस्थेचे प्रमुख विजय जिवरख यांना गावकऱ्यांनी भरारी पथक आल्याचे फोन करून सांगितले. इकडे पथकाला पाठवू नका, असे ते म्हणाले. त्यामुळे २२ कि.मी. अंतर कापून पथक औराळ्यात पोहोचले. शाळेत परीक्षा सुरू असल्याचे त्यांना दिसले. शिवाय एका बेंचवर समान विषयांच्या ३ परीक्षार्थींना बसवल्याचेही आढळले. जाब विचारला तर जिवरख यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पथकाने लेखी अहवाल परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी यांना पाठवला, पण त्यांनीही काहीच दखल घेतली नाही.

त्या कॉलेजची संलग्नताही काढून घेऊ भरारी पथकाने जर अहवाल पाठवला असेल तर तो माझ्यापर्यंत आला नाही. मी शनिवारी सायंकाळी परीक्षेचा आढावा घेतला होता. त्या वेळी हा मुद्दा चर्चेला आला नव्हता. पण असे असेल तर मी फक्त परीक्षा केंद्र रद्द करणार नाही, त्या कॉलेजची संलग्नताही काढून घेईन. - कुलगुरू डॉ. प्रमोद येवले





  Print






News - Rajy




Related Photos