महत्वाच्या बातम्या

 वर्धा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास सश्रम कारावास व दंड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास वर्धा येथील अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. टी सूर्यवंशी यांनी दंडासह सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. शैलेश देविदास मडावी असे शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव आहे.

शैलेश मडावी यास बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम कलम ०८ नुसार तीन वर्षांचा सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांचा कारावास. भादंविच्या कलम ३५४ अन्वये तीन वर्षांचा सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांचा कारावास, भादंविच्या कलम ३४१ अन्वये एक महिन्याचा सश्रम कारावास व ५०० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास आठ दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.


घरी जात असलेल्या पीडितेची वाट अडवून केला होता विनयभंग

संबंधित प्रकरणातील पीडिता ही २०१७ मध्ये बाराव्या वर्गाचे शिक्षण घेत होती. ती २९ जून २०१७ रोजी शिकवणी वर्ग आटोपून रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास दुचाकीने घरी जात असताना आरोपीने तिची वाट अडविली. आरोपी इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेचा विनयभंग केला. पीडितेने आरडा-ओरड केल्यावर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला होता.


घाबरलेल्या पीडितेने घेतला होता दुसऱ्याच्या घरात आश्रय

स्वत:च्या ताब्यातील दुचाकी आरोपीच्या दिशेने ढकलून आरोपीच्या तावडीतून कशीबशी सुटका केल्यावर पीडितेने रस्त्याच्या शेजारीच असलेल्या एका घरात थोड्या वेळाकरिता आश्रय घेतला. घाबरलेल्या पीडितेने स्वत:ला कसेबसे सावरत तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती या घरातील नागरिकांना दिल्यावर तिने याच ठिकाणाहून कुटुंबियांना तिच्या सोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी पीडितेने आश्रय घेतलेले घर गाठून तिला घरी नेले. त्यानंतर सावंगी (मेघे) पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदविण्यात आली.

संबंधित प्रकरणी तक्रार प्राप्त होताच सावंगी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली. या प्रकरणाचा तपास सावंगी (मेघे)चे तत्कालीन ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक मिलिंद पारडकर यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. शासकीय बाजू ॲड. विनय आर. घुडे यांनी मांडली, तर पैरवी अधिकारी म्हणून भारती करंडे यांनी काम सांभाळले. या प्रकरणी एकूण सात साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद व पुरावे लक्षात घेऊन अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. टी. सूर्यवंशी यांनी आरोपीस दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.





  Print






News - Wardha




Related Photos