२३ वस्तूंवरील जीएसटी दरात कपात , सुधारित जीएसटी दर १ जानेवारी पासून होणार लागू


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :   २३ वस्तूंवरील जीएसटी दरात कपात करण्याचा निर्णय शनिवारी ‘जीएसटी परिषदे’च्या ३१ व्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे टीव्ही संच, संगणकाचे मॉनिटर्स, सिनेमा तिकीट, पॉवर बँक आदी वस्तू आणि सेवा स्वस्त होणार आहेत.सुधारित जीएसटी दर १ जानेवारी २०१९ पासून लागू होणार आहेत. त्यामुळे नववर्षांची पहाट काही वस्तूंच्या स्वस्ताईने होईल.  सर्वाधिक म्हणजे २८ टक्के जीएसटी लागू असलेल्या आणखी सात वस्तूंना १८ टक्क्यांच्या करटप्प्यात आणण्याचा निर्णय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत घेण्यात आला. 
बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत, जेटली यांनी जीएसटीचा २८ टक्क्यांचा करटप्पा हळूहळू संपुष्टात येत असल्याचे सांगितले. डिजिटल कॅमेरा, मोबाइलच्या पॉवर बँक, व्हिडीओ कॅमेरा रेकॉर्डर्स, व्हिडीओ गेम कन्सोल्स, वाहनांचे ट्रान्समिशन शाफ्ट्स आणि क्रँक्स, गिअर बॉक्स, पुनप्र्रक्रिया केलेले टायर आदी वस्तूंवर आता २८ टक्क्यांऐवजी १८ टक्के जीएसटी लागू होईल. १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सिनेमा तिकिटांवरील जीएसटी २८ वरून १८ टक्के, तर १०० रुपयांपेक्षा कमी मूल्याच्या तिकिटांवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आला आहे.
जीएसटी दर वाजवी पातळीवर आणणे ही निरंतर सुरू राहणारी प्रक्रिया आहे. यापुढे सीमेंटवरील २८ टक्के जीएसटीही कमी करण्यात येईल, असे संकेत जेटली यांनी दिले. तूर्तास मात्र तसे करता येत नसल्याचे सांगत, सीमेंट आणि वाहनाच्या सुटय़ा भागांवरील जीएसटी कपातीने अनुक्रमे २० हजार कोटी रुपये आणि १३ हजार कोटी रुपयांचे महसुली नुकसान सोसावे लागेल, असे जेटली म्हणाले. सर्वोच्च २८ टक्क्यांच्या करटप्प्यात आता आलिशान मोटारगाडय़ा, वाहनांचे सुटे भाग, मद्य, वातानुकूलन यंत्रे, सीमेंट अशा केवळ २८ वस्तूच राहिल्या आहेत. जीएसटी कपातीतून सरकारला केवळ पाच हजार ५०० कोटी रुपयांचा महसूल गमवावा लागेल, असे जेटली यांनी सांगितले.
जीएसटी परिषदेने अपंग व्यक्तींसाठीच्या व्हीलचेअरचे सुटे आणि पूरक भागांवरील २८ जीएसटी पाच टक्क्यांवर आणला आहे. मालवाहू वाहनांच्या ‘थर्डपार्टी’ मोटार विम्याच्या हप्त्यांवरील कर १८ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर आणला आहे. संगमरवरी दगड, नैसर्गिक बूच (कॉर्क), चालण्यासाठीची आधाराची काठी, राखेपासून बनविल्या जाणाऱ्या विटा यांच्यावर आता ५ टक्के जीएसटी आकारला जाईल.   Print


News - World | Posted : 2018-12-23


Related Photos