महत्वाच्या बातम्या

 वर्धा जिल्ह्यातील पिक स्पर्धेत दोन शेतकऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : शेतकऱ्यांच्या नाविन्यपुर्ण प्रयोगाला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने पाच पिकांकरीता पिक स्पर्धा घेतली जाते. यावर्षी जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांना या स्पर्धेत राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहे.

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून नाविन्यपूर्ण प्रयोग करुन उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्याना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल वाढते. त्यासाठी राज्यात रब्बी हंगाम २०२१-२२ मध्ये ज्वारी, गहू, हरभरा करडई व जवस अशा एकुण पाच पिकाकरीता पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

या स्पर्धेत जिल्ह्यातील ३५ शेतकऱ्यांनी गहू व १६९ शेतकऱ्यांनी हरभरा पिकासाठी असे एकुण २०४ शेतकऱ्यांनी पिकस्पर्धेत सहभाग नोंदविला होता. त्यापैकी  वर्धा तालुक्यातील पेठ येथील शेतकरी प्रमोद मधुकर श्रीरामे यांनी हरभरा पिकाची रुंद वरंबा सरी पध्दतीने लागवड करुन उत्तम व्यवस्थापन करुन ५९ क्विंटल प्रति हेक्टर, असे विक्रमी उत्पादन घेऊन राज्यस्तरावर प्रथम पटकविला.

वर्धा तालुक्यातील शिरपूर येथील शेतकरी संदीप उत्तमराव शेंद्रे यांनी हरभरा पिकाची टोकन पध्दतीने लागवड करुन ४४ क्विंटल प्रति हेक्टरी असे उत्पादन घेऊन राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकविला. प्रथम विजेत्यास ५० हजार व व्दितीय विजेत्यास ४० हजार रुपये व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. येत्या खरीप व रब्बी हंगामात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिकस्पर्धेत सहभाग नोंदवावा. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करुन भरघोस उत्पन्न घेऊन पिकस्पर्धेच्या बक्षिसाचे मानकरी व्हावे व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos