जिल्ह्यातील वाहतूक यंत्रणेच्या समस्यांचा निपटारा तातडीने होईल : ना. राजे अम्ब्रीशराव महाराज


-  धानोरा बस स्थानकाचे लोकार्पण  थाटात 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / धानोरा : 
खूप दिवसांपासून धानोरा येथील  बसस्थानकाची मागणी होती. त्यामुळे मला मंत्रिपद मिळाल्यावर काही बाबी विशेषत्वाने पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेण्याचे ठरविले होते. त्यात धानोरा बस स्थानकाचा प्रामुख्याने समावेश होता. जवळपास २ वर्षांपूर्वी मी या बसस्थानकाच्या कामाचे भूमिपूजन केले होते. आज ते प्रत्यक्षात आलेले पाहून  अतिशय आनंद झालेला आहे. या बस स्थानकाच्या सुरक्षा भिंतीसाठीचा प्रस्तावही मंजूर झालेला आहे. काही दिवसांत तेही काम पूर्ण होईल. त्याचप्रमाणे आपण उपस्थित केलेल्या जिल्ह्यातील एकंदरीत वाहतूक यंत्रणेच्या समस्यांचा निपटारा येत्या काही दिवसांमध्ये तातडीने होईल. प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थ्यांची संख्या दुप्पट म्हणजे १०० होण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री  ना.  राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांनी केले. 
 ना. आत्राम यांच्या हस्ते  काल २१ डिसेंबर  रोजी धानोरा येथील बसस्थानकाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. 
राज्यमंत्री ना.  आत्राम  यांच्या  आदिवासी विभागांतर्गत दिलेल्या निधीतून या बसस्थानकाचे बांधकाम करण्यात आलेले आहे. राज्यमंत्री  ना आत्राम यांनी मागील ४ वर्षात केलेल्या अगणीत लोकोपयोगी कार्यांमध्ये पुन्हा एका कार्याची भर पडली, असे मत यावेळी उपस्थितांनी  व्यक्त केले. 
 पुढे बोलताना ना. आत्राम म्हणाले,  आज वाहतुकीची समस्या सगळीकडे जाणवते. ह्या मागचे मूळ कारण म्हणजे, रस्त्यांची असलेली दुरवस्था. आज मला सांगतांना अभिमान वाटतो की, आपण मागील ४ वर्षांत सम्पूर्ण जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे केली आहेत. एकट्या CMJSY या योजने अंतर्गत ५०० ते ६०० कोटींच्या वर कामे मी स्वतः पुढाकार घेऊन आणलेली आहेत. २५/१५, PMJSY अश्या पुन्हा कितीतरी योजना आहेत. ज्या अंतर्गत किमान १ हजार  कोटीच्या वर निधी आपण मागील ४ वर्षात फक्त रस्त्यांसाठी आणलेला आहे. त्याचसोबत या पेक्षाही जास्त निधी इतर विविध कामांसाठी आपण आणलेला आहे. तरीही जेव्हा लोकं म्हणतात की, विकास झालेला नाही. तेव्हा त्यांची मला कीव येते, अश्या प्रकारे पालकमंत्र्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी आमदार डॉ. देवराव होळी, नगराध्यक्षा लीलाताई साळवे, भाजपचे सुरेश शहा, शशिकांत साळवे, महिला आघाडीच्या ताराबाई कोटांगले , सभापती अजमल रावते, तहसीलदार गणवीर, नगरसेवक सुभाष धाईत, विनोद निंकरकर, गीताबाई वालकारे, रंजना सोकळे आदी मान्यवरांसोबतच बहुसंख्य  नागरिक उपस्थित होते. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-22


Related Photos