महत्वाच्या बातम्या

 निराधार-निराश्रित महिलांसाठी राज्यात शक्ती सदन योजना राबवणार : राज्याकडून १० कोटी ९४ लाखांची तरतूद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

वृत्तसंस्था / मुंबई : राज्यातल्या निराधार, निराश्रित तसेच कौटुंबिक हिंसाचारात बळी पडलेल्या बेघर आणि लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी व सक्षमी करणासाठी स्वाधार गृह व उज्ज्वल गृह या दोन केंद्रांच्या योजनांना एकत्र करून राज्यात शक्ती सदन ही योजना राबवण्यात येणार आहे. राज्यातील निराधार आणि निराश्रित महिलांसाठी राज्य सरकारने शक्ती सदन ही योजना अर्थसंकल्प मांडताना जाहीर केली होती. यात सामाजिक व आर्थिक पाठबळा शिवाय राहणाऱ्या
महिला, नैसर्गिक आपत्ती मध्ये बेघर झालेल्या महिलांना, कुटुंबाने आधार काढून घेतलेल्या निराधार महिला यांच्यासह कौटुंबिक हिंसाचारास बळी पडलेल्या बेघर महिला, अनैतिक व्यापारातून सुटका केलेल्या महिला व मुली आणि लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिला व मुलींसाठी ही योजना जाहीर करण्यात आली आहे.

या योजनेतील लाभार्थी महिलांना या शक्ती सदन योजनेत जास्तीत जास्त 3 वर्षांपर्यंत राहता येणार आहे. तर 3 वर्षांचा कालावधी संपल्यावर शक्ती सदनमध्ये राहण्याची परवानगी संबंधित जिह्याचे जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. तर 55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वृद्ध महिलांना शक्ती सदनमध्ये जास्तीत जास्त 5 वर्षांपर्यंत कालावधीसाठी राहता येईल. त्यानंतर या महिलांना वृद्धाश्रमात हलवण्याची सूचना या योजनेत करण्यात आली आहे.

राज्य सरकारने 50 शक्ती सदन उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केली आहे. त्यानुसार 2024-25 या वर्षात 20 नवीन संस्था उभारण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. तर या नव्या पद्धती नुसार 50 संस्थांसाठी केंद्र सरकारचे 60 टक्के आणि राज्य सरकारचे 40 टक्के असा निधी मिळणार आहे. त्यानुसार केंद्राकडून 16 कोटी 41 लाख 60 हजार इतका, तर राज्याचा 10 कोटी 94 लाख 40 हजार असा एकूण 27 कोटी 36 लाख इतक्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांचे बँक खाते सुरू करून त्यांच्या बँक खात्यात 500 रुपये जमा करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. बँकेत जमा केलेल्या रकमेच्या व्याजासह संपूर्ण रक्कम सदनामधून बाहेर पडताना दिली जाईल.





  Print






News - Rajy




Related Photos