ग्रंथालयाचे एकत्रीकरण करुन ग्रंथ संपदेचे जतन करा - अनिल चनाखेकर


-  नागपूर ग्रंथोत्सव २०१८ चा समारोप
- कवी संमेलनात प्रेक्षकांची मिळाली दाद 
विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर  :
आधुनिकीकरणाच्या युगात ग्रंथालयाच्या माध्यमातून ग्रंथ संपदेचे जतन केले जात आहे. ही संपदा चिरकाळ टिकवून ठेवायची असेल तर काळानुरुप ग्रंथालयांचे एकत्रीकरण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी अनिल चनाखेकर यांनी केले.  
वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेच्या सभागृहात राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मुंबई, जिल्हा ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ‘नागपूर ग्रंथोत्सव २०१८’चे समापन करण्यात आले. यावेळी ते अध्यक्षीय भाषण करताना बोलत होते.
यावेळी वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेचे प्रा. डॉ. सुनील पुनवटकर, समीक्षक किशोर भांदककर, जिल्हा ग्रंथपाल गजानन कुरवाडे आदी उपस्थित होते.
जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने आयोजित ‘ग्रंथजत्रा’च्या माध्यमातून अनेक नामवंत विचारवंतांचे विचार या व्यासपीठाद्वारे ऐकण्याची संधी मिळाली. सोशल मिडिया, संगणकांसारख्या आधुनिक उपकरणांमुळे पुस्तक वाचनाचे महत्त्व कमी होत चालले आहे. ही संस्कृती पुन्हा स्थापित करण्यासाठी ग्रंथालयांचे एकत्रिकरण होणे गरजेचे आहे. याशिवाय दरमहा ग्रंथोत्सवाचे महाविद्यालय, संस्थांच्या माध्यमातून आयोजन केल्यास नव्या पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन ग्रंथ संपदेचे जतन करण्यास मदत होईल, असा सल्ला रंगकर्मी अनिल चनाखेकर यांनी दिला.
ग्रंथालय हे संस्कार घडविते. तरुण पिढीमध्ये ग्रंथाची ओढ निर्माण करण्याचे कार्य अनुभवी व अबाल-वृद्धांनी केले पाहिजे. त्यासाठी तरुणाईला ग्रंथालयाकडे आणण्यासाठी येथे संगणकीकरणयुक्त सुविधा निर्माण केल्या पाहिजे. तेव्हाच चैतन्य व उत्साह निर्माण करणाऱ्या ग्रंथोत्सवाला जीवंतपणा येईल, असे विचार समिक्षक किशोर भांदककर यांनी व्यक्त केले.
ग्रंथपाल प्रा. डॉ. सुनील पुनवटकर यांनी दोन दिवसीय कार्यक्रमाची महती सांगताना वाचनाने कल्पनाशक्ती वाढते. त्यामुळे ग्रंथाशी प्रत्येकाने मैत्री करावी, असा सल्ला देत वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेला ग्रंथोत्सवाचा भाग होण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार श्रीमती वृषाली देशपांडे यांनी मानले. तत्पूर्वी झालेल्या कवी संमेलनात उपस्थित कवी व कवियत्रींनी ग्रंथ, मातृभाषा तसेच मातेच्या वेदनांना आपल्या शब्द बंधनात बांधून सादरीकरण केले. उपस्थितांच्या शब्दांनाही प्रेक्षकांनी दाद दिली.  Print


News - Nagpur | Posted : 2018-12-22


Related Photos