महत्वाच्या बातम्या

 भाजपचे नेते खासदार गिरीश बापट यांचे निधन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : भाजपचे नेते तथा खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. ते गेल्या अनेक महिन्यापासून आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले आहे.

गिरीश बापट यांचा जन्म ३ सप्टेंबर १९५० रोजी पुण्यात झाला. तळेगाव दाभाडेमधून प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांचे माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेत झाले. बीएमसीसीत वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यावर बापट १९७३ मध्ये टेल्कोमध्ये कामगार म्हणून रुजू झाले. त्यानंतर दोन वर्षांतच आणीबाणीमध्ये १९ महिन्यांचा कारावास नाशिक जेलमध्ये त्यांनी भोगला. पुण्यात भाजपला यशस्वी करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे.

पुण्याची ताकद गिरीश बापट अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पुण्यातील कसबा मतदार संघात आणि इतर पुण्यात भाजप पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली होती.

माझे लोकसभेतील सहकारी आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले. ही बातमी अतिशय दुःखद आहे. सलग पाच वेळा पुण्यातून ते आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले. त्यांना काही काळ राज्य मंत्रिमंडळातही काम करण्याची संधी लाभली होती. त्यांच्या निधनामुळे एक मनमिळाऊ स्वभावाचे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. भावपूर्ण श्रद्धांजली - खासदार सुप्रिया सुळे





  Print






News - Rajy




Related Photos