महत्वाच्या बातम्या

 झोपटपट्टी सक्षमीकरण योजनेस प्रारंभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : 
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे आयोजित झोपडपट्टी सक्षमीकरण योजनेचा शुभारंभ प्रमुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. बी. अग्रवाल यांनी केला. यावेळी नागपूर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त  प्रकाश वराडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जयदिप पांडे, जिल्हा विधी संघटनेचे अध्यक्ष रोशन बागडे उपस्थित होते.भारत लोक कल्याणकारी राष्ट्र असून घटनेनुसार सर्वांना न्याय मिळावा ही संकल्पना आहे. त्यानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, वकील संघ यांनी मिळून जिल्ह्यात झोपट्टी सक्षमीकरण योजनेस प्रारंभ केला आहे. तो अभिनंदनीय आहे.

या योजनेत स्वयंसेवी संघटनेचे सहकार्य लाभत आहे, ते प्रशंसनीय आहे, असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. अग्रवाल यांनी उदघाटनपर भाषणात सांगितले. कोणत्याही शहरात झोपडपट्टी हा अविभाज्य भाग असतो. राहण्याची सोय नसल्यामुळे ते येथे राहतात. त्यामुळे कुटुंबात शिक्षण व आरोग्याचा अभाव असतो. त्यासाठी या घटकासांठी मदत करणे आवश्यक आहे. त्यांना जन्म दाखले, जात प्रमाणपत्र मिळवून दिल्यास ते मुख्य प्रवाहात येतील व प्रशिक्षणाद्वारे त्यांना रोजगाराची संधी मिळेल, असे जिल्हा विधी संघाचे अध्यक्ष रोशन बागडे यांनी सांगितले. यावेळी मनपाचे सहाय्यक आयुक्त प्रकाश वराडे यांनी या योजनेस महानगरपालिकेचे नेहमी सहकार्य असल्याचे सांगितले.

प्रास्ताविकात प्रत्येक घटकापर्यंत जाऊन कायदे विषयक जनजागृती करणे हा मुख्य उद्देश जिल्हा विधी प्राधिकरणाचे आहे. झोपडपट्टीतील कुटुंबाना सर्व प्रकारचे सहकार्य करणे व कायदे विषयक, शासकीय कागदपत्रे मिळविण्याकरीता तसेच शिक्षण व रोजगाराबाबत येणाऱ्या समस्यांबाबत जनजागृती व्हावी, हा या योजनेचा उद्देश असल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जयदिप पांडे यांनी सांगितले. यासाठी स्वयंसेवी संघटनाचे मोठी मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेचे सादरीकरण आनंद मांजरखेडे यांनी केले. योजनेबद्दल माहिती देतांना शहरात 426 कुटुंब असून प्रथम 293 नोंदणीकृत कुटुंबांना याचा लाभ देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वयंसेवी संघटनेच्या डिम्पी बजाज व आसना खान यांनी  सतरापूर कन्हान व रहाटे टोली येथील झोपडपट्टीतील व्यक्ती व मुलांकरीता वॉटर फिल्टर व पुस्तके दिली. त्याचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. जन्मतारखेचा दाखला वितरीत करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन अँड. सुरेखा बोरकुटे यांनी केले तर आभार सुनंदा निंबाळकर यांनी मानले.





  Print






News - Nagpur




Related Photos