कमलापूर हत्तीकॅम्पमध्ये नवीन पाहूणी, ‘सई’ नावाने केले नामकरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
विशेष प्रतिनिधी / अहेरी
: सिरोंचा वनविभागातील कमलापूर वनपरीक्षेत्रात येत असलेल्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये आज १९ डिसेंबर रोजी एका हत्तीणीने पिल्लाला जन्म दिला आहे. या नवीन पाहूणीला ‘सई’ हे नाव देण्यात आले आहे.
कमलापूर हत्ती कॅम्प मध्ये एकूण आठ हत्ती होते. यामध्ये मंगला, अजित, बसंती, प्रियंका, गणेश, राणी, आदित्य आणि रूपा यांचा समावेश आहे. यापैकी अजित आणि राणी यांच्यापासून सई चा जन्म झाला आहे. सईची प्रसुती प्रक्रिया पशुवैद्यकीय अधिकारी खेमलापुरे, राउत, तसेच वनपरीक्षेत्र अधिकारी जी.एम. लांडगे यांच्या निगराणीत झाली. सई सुदृढ तसेच सशक्त असल्याचे सांगण्यात आले आहे.
हत्ती कॅम्पमध्ये सईच्या आगमनामुळे कमलापूर परिसरात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. हत्तीकॅम्पचा निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी प्रस्ताव सादर केल्याचे सिरोंचा वनविभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी सांगितले. या परिसराचा निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीकोणातून विकास साधल्यास येथील स्थानिक जनतेस मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होउन नक्षल प्रभावीत असलेल्या कमलापूर परिसराच्या विकासास चालना मिळेल, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-18


Related Photos