खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस दहा वर्षानंतर अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वरोरा : ट्रकवर कंडक्टर म्हणून कामाला असलेल्या व्यक्तीचा भांडे न धुतल्याच्या कारणावरून मारहाण करून खून करणाऱ्या फरार आरोपीस तब्बल दहा वर्षानंतर वरोरा पोलिसांनी अटक केली आहे.
अरूणसिंग उमेदसिंग महंतो रा. वाडपल्लीचा बिजलीमलाई पेट्रोल पंपजवळ ता. वाड जि. पाटण असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. १६ डिसेंबर २००६ रोजी वरोरा पोलिस ठाण्यात राकेश महंतो याच्या आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता. मृतक राकेश लगनु महंतो हा ट्रक क्रमांक ओआर १४ जे ७९६५ वर कंडक्टर म्हणून काम करीत होता. आरोपी अरूणसिंग याने राकेशसोबत भांडे न धुतल्याच्या कारणावरून भांडण करून मारहाण केली व त्याचा खून केला. तसेच पुरावा नाहीसा करण्याकरीता मृतकाचे प्रेत वर्धा नदीच्या पुलावरून नदीपात्रात फेकून दिला. तसेच नातेवाईकांना अपघातात राकेश मरण पावल्याची खोटी माहिती दिली. याबाबत वरोरा पोलिसांनी कलम ३०२ , २०१ , २०२ , २०३ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
आरोपी अरूणसिंग महंतो हा घटनेपासून फरार होता. पोलिसांनी पथके तयार करून त्याची शोधमोहिम सुरू केली होती. आरोपीस गोपनिय माहितीच्या आधारे १६ डिसेंबर रोजी कामगार नगर राजुरा येथून ताब्यात घेतले. त्याला उद्या १९ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.
News - Chandrapur | Posted : 2018-12-18