महत्वाच्या बातम्या

 पौष्टिक तृणधान्याचे क्षेत्र वाढवून त्याचे मुल्यवर्धन करा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


-  श्री अन्न जनजागृती कार्यशाळा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी/ वर्धा : ग्रामीण भागात आर्थिक सुबत्ता आणि रोजगार निर्मितीमध्ये कृषी क्षेत्राची महत्वाची भूमिका आहे. कृषी प्रक्रिया उद्योग स्वयंरोजगारातूनही उभारता येतात. शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी कृषी उद्योगाचा आधार घ्यावा तसेच श्री अन्न म्हणजेच पौष्टिक तृणधान्याचे क्षेत्र वाढवून त्याचे मुल्यवर्धन करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा व भारतीय कृषी अनुसंधान परिषद - राष्ट्रीय पादप आनुवंशिक संसाधन ब्युरोच्या संयुक्त विद्यमाने श्री अन्न अर्थात पौष्टिक तृणधान्य जनजागृती कार्यशाळेचे आयोजन सेलसुरा येथे करण्यात आले होते.

त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह एनबिपिजिआर अकोलाचे वरिष्ठ वैज्ञानीक तथा प्रभारी अधिकारी डॉ.सुनिल गोमाशे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा केव्हीकेचे प्रमुख डॉ.जीवन कतोरे उपस्थित होते. कार्यक्रमा दरम्यान एनबिपिजिआर मार्फत ग्रामीण भागातील अनुसूचित जातीचे शेतकरी व महिला यांना पीएसबी, ट्रायकोडर्मा, गांडूळखत, भाजीपाला बियाणे किट तसेच एक टोपले, बॅग व कॅप वाटप करण्यात आले. तृणधान्याच्या विविध वाणांचा प्रसार व प्रचार करण्याच्या अनुषंगाने प्रदर्शनीचे देखील आयोजन करण्यात आले होते.

तृणधान्ये हा ऊर्जा देणारा सर्वोत्तम स्रोत आहे. बहुतांश देशांमध्ये याचा मुख्य आहारामध्ये समावेश आहे. सध्या ओट्सना विशेष मागणी आहे. ओट्सच्या माध्यमातून अन्य तृणधान्यांइतकीच पोषणतत्त्वे शरीराला प्राप्त होतात. राहत्या भागामध्ये सहजरीत्या उगवत असलेली आणि उपलब्ध असलेली तृणधान्ये आहारात घेण्याकडे अधिक प्राधान्य द्यावे, असे डॉ. गोमाशे यांनी सांगितले. गांडूळखत वापरून भाजीपाला उत्पादन घेतल्यास अधिक उत्पन्न प्राप्त होईल तसेच तुरीवर मर रोग टाळण्यासाठी ट्रायकोडर्माचा वापर करावा, असे डॉ.कतोरे यांनी सांगितले.

तृणधान्य पिकांची लागवड याविषयी कृषिविद्या विषयतज्ञ डॉ.रुपेश झाडोदे यांनी मार्गदर्शन केले तसेच पौष्टीक तृणधान्याचे महत्व व मूल्यवर्धन प्रक्रिया याविषयी गृह विज्ञान विषयतज्ञ डॉ. प्रेरणा धुमाळ यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन व आभार विस्तार शिक्षण विषयतज्ञ डॉ. अंकिता अंगाईतकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ. निलेश वझीरे, डॉ. सचिन मुळे, किशोर सोळंके, पायल उजाडे, वैशाली सावके, समीर शेख, गजेंद्र मानकर, वसीम खान यांनी योगदान दिले.





  Print






News - Wardha




Related Photos