अवकाळी पावसाची रिपरिप, गारठा वाढला, रब्बी पिकांची वाताहात


- जिल्हाभर पावसाने आणले नागरीकांना जेरीस
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : पहाटेपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावली असून वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. यामुळे प्रचंड गारठा वाढला आहे. अशातच रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून राज्यभर अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावली. यामुळे थंडीने आबालवृध्दांचे हाल होत आहेत. शेतकऱ्यांची रब्बी पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाने धान पिकांचे नुकसान केले आहे. चामोर्शी तालुक्यातील बहूतांश शेतकरी कापूस वेचणीची कामे करीत आहेत. मात्र पावसामुळे कापसाच्या पिकाला फटका बसला आहे. तूर पिकांला आलेला बहर गळायला लागला आहे. रब्बीच्या इतरही पिकांना तसेच भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. मळणी केलेले धान विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांनाही फटका बसला आहे. तसेच खरेदी केलेले धान ठेवण्यासाठी पुरेसे गोदाम नसल्यानेही धान भिजून सडण्याचा धोका आहे. जिल्ह्यातील अहेरी उपविभागातसुध्दा पावसाची रिपरिप सुरूच आहे. भामरागड, एटापल्ली, सिरोंचा तालुक्यातही सर्वदूर पाउस सुरूच आहे. यामुळे नागरीक हैराण झाले आहेत.
News - Gadchiroli | Posted : 2018-12-17