अरे हे कोण मोजलंय आता ! पोर्ला ते आरमोरी ४५ किमी ?


- अंतर दर्शविणारे फलक करीत आहे दिशाभूल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
अजय कुकडकर / गडचिरोली :
कोणत्याही मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी रस्त्याचे अंतर हे रस्त्याच्या बाजूला असलेल्या किलोमीटरच्या दगडावरून निदर्शनास आणून घेतात. मात्र हे अंतर दर्शविणारे फलकच दिशाभूल करीत असतील तर अंतर पार करावे किती, हाच प्रश्न उपस्थित होतो. असा प्रसंग सध्या गडचिरोली - आरमोरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या नवख्या प्रवाशांना अनुभवास मिळत आहे. हे अंतर पार केल्यावर प्रवासीच म्हणत आहेत, अरे हे कोण मोजलंय, पोर्ला ते आरमोरी ४५ किमी कसे?
गडचिरोली ते आरमोरी हे अंतर ३४ किमी एवढे आहे. या मार्गावर पोर्ला हे गाव गडचिरोलीपासून १५ किमी अंतरावर आहे. पोर्ला येथील बसस्थानकावर अंतर दर्शविणारे एक फलक लावण्यात आले आहे. या फलकावर गडचिरोली १५ किमी दर्शविण्यात आले आहे तर आरमोरीचे अंतर तब्बल ४५ किमी दर्शविण्यात आले आहे. वास्तविक पोर्ला ते आरमोरीचे अंतर फक्त १९ किमी आहे. असे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणत्या हिशोबाने ४५ किमी अंतर दर्शविले हा प्रश्न अनेकांना पडत आहे. नेहमी आवागमन करणारांसाठी अंतराचे फलक पाहणे तेवढे महत्वाचे नाही. मात्र नवखे प्रवासी मुख्य मार्गावरून प्रवास करताना अशा फलकांकडे आवर्जून पाहतात. मुख्य मार्गावरच असे दिशाभूल करणारे फलक असतील तर इतर दुर्गम गावात जाणाऱ्या रस्त्यांवरील फलकांची कल्पना न केलेलीच बरी. या फलकाच्या या गंभीर चुकीकडे कोणाचेच लक्ष जात नसावे की जाणीवपूर्वक दूर्लक्ष केले जात आहे, असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. 

 



  Print






News - Gadchiroli | Posted : 2018-12-17






Related Photos