महत्वाच्या बातम्या

 तपासणी व नोंदणी शिबिराचा ३ हजार ६०० दिव्यांगांनी घेतला लाभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाच्यावतीने दिव्यांग बांधवांसाठी  साहित्य तपासणी व नोंदणी शिबिराचे तालुका स्तरावर आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला जिल्हाभर उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. जिल्ह्यात एकुण ३ हजार ६३९ दिव्यांगांची मोफत साहित्य देण्यासाठी तपासणी करण्यात आली.

तालुका स्तरावर आयोजित या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले होते. त्यामुळे त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी दिव्यांग बांधवांनी उपस्थिती दर्शवून तपासणी व नोंदणी करुन घेतली. तपासणी केलेल्या दिव्यांगांना केंद्रीय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या भारतीय कृत्रिम अंग निगमच्यावतीने नि:शुल्क साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

वर्धा तालुक्याच्या शिबिराचा ९५१ दिव्यांगांनी उपस्थित राहून लाभ घेतला. आष्टी येथील शिबिरात ४०५, कारंजा येथील शिबिरात ३३७, हिंगणघाट तालुक्याच्या शिबिरात ३६२, देवळी व पुलगाव येथील शिबिरात ५९१, आर्वी येथील शिबिरात ४४७, समुद्रपूर येथील शिबिरामध्ये ३६०, सेलू तालुक्याच्या शिबिरात २८६ याप्रमाणे जिल्हाभर एकुण ३ हजार ६३९ दिव्यांग बांधवांनी कृत्रिम अंग साहित्यासाठी तपासणी करुन घेतली.

तपासणी केलेल्यांमध्ये ४४७ अंध बांधवांचा समावेश आहे. मुकबधीर ६१३, मतीमंद २०६ तर सर्वाधिक २ हजार ३७३ अस्थिव्यंगांचा समावेश आहे. तपासणी केलेल्या या बांधवांचे साहित्य तयार होऊन आल्यानंतर त्यांना वितरीत केले जाणार आहे, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्राजक्ता इंगळे यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos