धान व कापसाच्या नुकसानी बाबत गडचिरोलीत होणार विदर्भाची दुष्काळी परिषद


- शेकापच्या मध्यवर्ती समीतीची दुष्काळावर चर्चा 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने या परिस्थितीत जनतेला दिलासा देण्यासाठी व्यापक आंदोलन उभे करण्याच्या दृष्टीने शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समीतीची अलिबाग येथे  जेष्ठ आमदार  गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार  जयंत पाटील, आमदार  धैर्यशील पाटील, आमदार भाई पंडीतशेठ पाटील, आमदार  बाळाराम पाटील, प्रविणदादा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार व रविवारला दोन दिवशीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत शेकापचे जिल्हा चिटणीस  रामदास जराते यांनी गडचिरोली जिल्ह्यातील धानाच्या नुकसानीबाबत मांडणी केली. तसेच जिल्ह्यातील मोठा रोजगार असलेल्या तेंदूपत्त्याचे दर सरकारच्या जीएसटी मुळे कमी झाल्याने रोजगार हिरावला गेल्याची परिस्थिती मांडून शेकापने गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी व धान उत्पादक ओबीसी शेतकऱ्यांच्या बाजूने राहण्याची विनंती केली. यावर या मध्यवर्ती समीतीने फेब्रुवारीत विदर्भातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांची गडचिरोली येथे दुष्काळ परिषद आयोजित करून सरकारला दुष्काळ निवारणासाठी सर्वकष उपाययोजना करण्यास बाध्य करण्यात येईल असा निर्णय घेतला. या बैठकीत आरमोरी विधानसभा चिटणीस रोहिदास कुमरे, ओबीसी जागृती अभियानाचे जिल्हा समन्वयक दिनेश बोरकुटे, चामोर्शी तालुका चिटणीस दिनेश चुधरी, दत्तू चौधरी सहभागी झाले होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-16


Related Photos