महत्वाच्या बातम्या

 जी-२० अंतर्गत झालेल्या सी -२० प्रारंभिक बैठकीचा समारोप 


- सी-20 परिषदेत परस्परांच्या संस्कृतीचा आदर राखण्यावर भर
- दोन दिवसीय बैठकीचा समारोप : शिखर बैठक जयपुरला

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : जी-20 अंतर्गत झालेल्या सी -20 प्रारंभिक बैठकीचा शानदार समारोप शहरात झाला. या बैठकीमध्ये झालेल्या विचार मंथनातून निघालेले प्रस्ताव पुढील शिखर बैठकीत ठेवले जाणार आहेत. या बैठकीमध्ये जगभरातील विविधतेचा आदर करण्याचा आणि मानवतेला सर्वोच्च मानून सामान्य माणसाच्या आयुष्यात शाश्वत बदल करण्यासाठी नागरी संस्थांनी वाटचाल करावी, अशा अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या. मान्यवरांच्या मार्गदर्शनात या दोन दिवसीय बैठकीचा नागपुरच्या आदरातिथ्याचे कौतुक करीत समारोप करण्यात आला. नागपूरमध्ये 20 व 21 मार्च रोजी जी- 20 अंतर्गत सी-20 च्या प्रारंभिक बैठकीचे स्थानिक रॅडिसन ब्लू हॅाटेल येथे आयोजन करण्यात आले होते.

विदेश मंत्रालयाच्या अंतर्गत स्थानिक सामाजिक संस्थांनी आयोजित केलेल्या या जागतिक स्तरावरील बैठकीच्या समारोप सत्राला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी, सी -20 परिषदेच्या उदघाटक माता अमृतानंदमयी, जी-20 चे शेरपा तथा भारताचे माजी राजदूत विजय नांबियार, जी-20 चे शेरपा तसेच विदेश मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अभय ठाकूर, सी-20 सचिवालयाचे संरक्षक डॅा. विनय सहस्त्रबुद्धे, कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्षा निवेदिता भिडे, सुप्रसिद्ध व्यावसायिक तथा स्थानिक आयोजन समितीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांच्यासह नागरी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

विजय नांबियार यांनी सी-२० परिषदेत पार पडलेले विविध परिसंवाद व विविध समित्यांमधील विषयांचा संक्षिप्त आढावा घेतला. दोन दिवसात एकूण चार परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पर्यावरणासोबत विकासाचा समतोल राखणे, नागरी संस्था व्यवस्थापन आणि मानवी मुल्यांना प्रोत्साहन, मानव विकासामध्ये नागरी संस्थांची भूमिका, अभिनवता आणि तंत्रज्ञानाचे प्रवर्तक म्हणून नागरी संस्थांची भूमिका या चार विषयांचा समावेश होता. देश विदेशातील तज्ज्ञांनी या विषयांवर विचारमंथन केले. या विचार मंथनातून तयार झालेल्या प्रस्तावांची मांडणी पुढील बैठकीत केली जाणार आहे. शेरपा अभय ठाकूर यांनी भौगोलिकदृष्ट्या नागपूर शहराचे स्थान व येथील उत्तम पायाभूत सुविधांमुळे सी-२०परिषदेचे या शहरातील आयोजन औचित्यपूर्ण  ठरल्याचे सांगितले.

जयपूर येथे ३१ जुलै २०२३ रोजी पार पडणाऱ्या सी- २० च्या शिखर परिषदेत नागपुरातील परिषदेतील मंथनातून आलेले विषय अंतर्भूत होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. निवेदिता भिडे यांनी अध्यात्म ही संकल्पना व्यापक असल्याचे सांगून सर्व समाज घटक एक असल्याची मूळ भावना अध्यात्माचा गाभा असल्याचे सांगितले. सी-२० चे धोरण ठरवतांना जागतिक स्तरावर दीर्घकाळ उपयोगी ठरतील आणि पूर्णतः मानवतेच्या हिताचे असेच विषय अंतर्भूत होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पर्यावरणपूरक यंत्रणा निर्माण करणे उद्याच्या पर्यावरणपूरक जगासाठी आवश्यक असल्याचे सोदाहरण सांगितले. शेतीला आता केवळ अन्नधान्य पुरवठा करणारे कोठार न समजता ऊर्जास्त्रोत तयार करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच 2070 पूर्वी भारताला कार्बनमुक्त देश करणार असल्याचे सांगितले.

मुल्यांवर आधारित भारतीय कुटुंबरचना व त्यातून वसुधैव कुटुंबकम भूमिका साकारताना समतोल विकासाचे आर्थिक आणि सामाजिक विकासाचे धोरण अवलंबवावे लागेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात जगातील गतीने विकसित होणारी अर्थसत्ता म्हणून भारत पुढे येत आहे. मात्र, ही वाटचाल सुरू असताना आमची सामाजिक वाटचाल ही मुल्याधारित, आर्थिकदृष्टया सक्षम, पर्यावरणपूरक व निसर्गाशी एकरूप असणारी अशी असावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नागपूर हे शहर परिवर्तनाची आणि नागरी संस्थांच्या चळवळींची भूमी असल्याचे स्पष्ट करताना नागपुरवरून जाताना भारताचे हृदय असणा-या संत्रानगरीतील गेल्या दोन दिवसातील आठवणी घेऊन जा, अशीभावनिक साद घातली.

डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी अध्यक्षीय समारोपात नागरी संस्था समोरील तंत्रज्ञान आणि स्थानिक प्रशासनाच्या आवाहनांचा आढावा घेतला. नागपुरातील सी-२० परिषदेत चर्चिल्या गेलेल्या विविध विषयांवरील महत्वाच्या बिंदूवरही लक्ष वेधले. नागपुरातून जाताना अनेक सुखद आठवणी देश विदेशातील पाहुणे घेऊन जात असल्याचे ते म्हणाले. सोबतच नागपुरातील पाहुणचारासाठी व आयोजनासाठी त्यांनी स्थानिक नागरी संस्था, आयोजक आणि प्रशासनाचे आभार मानले. 

एक जग, एक कुटुंब, एक भविष्य या मान्यतेवर पुढील काळात वाटचाल करणार आहोत. तथापि हे धोरण ठरविताना जगाच्या विविधतेचा आदर करताना मानवतेला सर्वोच्च स्थान देण्यात यावे. मानवतेसाठी राग, द्वेष दूर करून सौहार्द निर्माण करण्यासाठी परस्परांशी कुटुंबाप्रमाणे जोडले जाणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत मानवतेला धोका निर्माण होणार नाही. प्रत्येकाच्या सांस्कृतिक वारशावर तेथील आर्थिक उन्नती अवलंबून असते. त्यामुळे मूळ गाभ्याला धोका पोहोचणार नाही, अशी वाटचाल करण्याची अपेक्षा मान्यवरांनी समारोपीय भाषणात व्यक्त केली.





  Print






News - Nagpur




Related Photos