भरधाव कार झाडावर आदळल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू


वृत्तसंस्था / बीड : जिल्ह्यातील माजलगाव येथे भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.  शुक्रवारी  रात्री १० वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील टाकरवन फाट्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात सुरेश हरयानी, हेमंत राजपूत, रोहित (सर्व राहणार मध्यप्रदेश) या तिघांचा मृत्यू झाला असून तिघेही कपड्याचे व्यापारी आहेत.
इंदूर येथे राहणारे सुरेश हरयानी, हेमंत राजपूत, रोहित हे तिन्ही व्यापारी हे बीड येथील व्यापाऱ्यांकडे आले होते. दिवसभर त्यांची भेट घेऊन रात्री मुक्कामासाठी लातूर येथे जात होते. गढी, माजलगाव मार्गे राष्ट्रीय महामार्ग २२२ वरून जात असताना टाकरवन फाट्याजवळ  चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात असलेली कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली.
या भीषण अपघातात कारमधील तिन्ही व्यापारी जागीच ठार झाले. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. रात्री उशीरा तिन्ही मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. अपघाताची माहिती मयत व्यापाऱ्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली असून ते माजलगावकडे रवाना झाले आहेत.  Print


News - Rajy | Posted : 2018-12-15


Related Photos