हैद्राबाद - सिरोंचा - गडचिरोली बस नंदीगाव जवळील नाल्याच्या पुरात वाहून गेली , प्रवासी थोडक्यात बचावले


- ग्रामस्थांच्या सतर्कतेने बचावले प्रवाशांचे प्राण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
विशेष  प्रतिनिधी / अहेरी 
: हैद्राबाद - सिरोंचा - गडचिरोली या हिरकणी बस आज हैद्राबाद येथून येत असताना आलापल्ली - सिरोंचा मार्गावरील नंदीगाव जवळील नाल्यावरील पुराच्या पाण्यात वाहून गेली. यामुळे २० ते २५ प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. मात्र ग्रामस्थांच्या मदतीने प्रवाशांना सुखरूप काढण्यात आले असून मोठा अनर्थ टळला आहे. सदर घटना आज २० आॅगस्ट रोजी सायंकाळी ४.३०  वाजताच्या सुमारास घडली.
गडचिरोली आगाराची हिरकणी बस गडचिरोली येथून काल १९ आॅगस्ट रोजी सकाळी ७.३०  वाजता गडचिरोली येथून आष्टी - आलापल्ली - सिरोंचा मार्गे हैद्राबाद येथे पोहचली. आज २० आॅगस्ट रोजी ही बस परत येत असताना आलापल्लीपासून ३० किमी अंतरावर असलेल्या नंदीगावजवळील  नाल्यावरील पुराच्या पाण्यात अडकली. पुलावरून पाणी वाहत असताना चालकाने बस निघेल या उद्देशाने बस टाकली. मात्र पाण्याचा प्रवाह वाढल्याने बस पाण्यामध्ये वाहून जाऊ लागली. यावेळी बसमध्ये २० ते २५ प्रवासी होते. ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. मात्र बस जोरदार पाण्याच्या प्रवाहामध्ये अडकली. सर्व प्रवासी सुरक्षित असून बस पाण्यामध्येच अडकून पडली आहे. योग्यवेळी सतर्कता बाळगली नसती तर मोठा अनर्थ घडला असता. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-20


Related Photos