आयसीटी शिकविणारे राज्यातील ८ हजार शिक्षक होणार उद्यापासून बेरोजगार!


- उद्यापासून संपणार शिक्षकांचा करार
- विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी शिक्षकांना कायम करण्याची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी/ गडचिरोली :
राज्यातील विद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आसीटी (इन्फर्मेशन अॅन्ड कम्युनिकेशन टेक्नाॅलाॅजी) हा विषय शिकविणारे सुमारे ८ हजार शिक्षक उद्या १५ डिसेंबरपासून बेरोजगार होणार आहेत. या आठ हजार शिक्षकांना वार्यावर सोडल्यामुळे राज्यातील १३ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याचासुध्दा प्रश्न उद्भवणार आहे.
केंद्र सरकारने माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना संगणक साक्षर व संगणकाचे ज्ञान देण्यासाठी २००८ मध्ये आयसीटी योजना सुरू केली. विविध कंपन्यांशी करार करून सुमारे ८ हजार शिक्षकांना कंत्राटी तत्वावर नेमणुका देण्यात आल्या. शासनाने संगणक शिक्षकांना कायमस्वरूपी रोजगार द्यावा या मागणीसाठी अनेकदा आंदोलने करण्यात आली. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी या शिक्षकांना लाठीमार सुध्दा खावा लागला होता. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शासन संगणक शिक्षकांना बेरोजगार होवू देणार नाही, असे आश्वासन देवून शिक्षकांना कायम सेवे घेण्यासाठी देशातील अन्य राज्यांच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने अभ्यास करून धोरण ठरविण्यात येईल आणि मंत्रीमंडळात चर्चा घडवून आणून आर्थिक तरतूद करण्याचा प्रस्ताव तयार केला जाईल. तसेच सध्या कार्यरत बीएड धारक संगणक शिक्षकांना प्राधान्याने सामावून घेण्यात येईल. त्यासाठी शासनाच्या वतीने शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल, असेही आश्वासन दिले होते. मात्र याबाबत अद्याप कोणतेही ठोस निर्णय घेण्यात आले नाही. यामुळे उद्या १५ डिसेंबरपासून या शिक्षकांचा विविध कंपन्यांशी असलेला करार संपणार आहे. आता या शिक्षकांवर बेरोजगार होण्याची पाळी आली आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-14


Related Photos