रापमची भरती संचालक मंडळाने अमान्य केल्यानंतर घेतली उमेदवारांची वैद्यकीय चाचणी


- वैद्यकीय तपासणी झालेले उमेदवार नोकरीपासून वंचित
- तत्काळ रूजू करून घ्या अन्यथा आंदोलन करणार : अ‍ॅड.  पारोमिता गोस्वामी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
२०१५ मध्ये राज्य परिवहन महामंडळामध्ये घेण्यात आलेल्या भरतीमध्ये चालक पदाच्या उमेदवारांची वैद्यकीय तपाणी पूर्ण केल्यानंतर अद्यापही रूजू करून घेण्यात आले नाही. याबाबत माहिती अधिकारांतर्गत माहिती मागविण्यात आली होती. यामध्ये एसटी महामंडळ आणि परिवहन मंत्र्यांचा फोलपणा उघड झाला असून संचालक मंडळाने भरतीच अमान्य केल्याची बाब पुढे आली आहे. यामुळे अनेक उमेदवारांवर अन्याय झाला आहे. या उमेदवारांना नोकरीत रूजू करून घेण्यात यावे, अन्यथा तिव्र आंदोलन करू असा इशारा श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अ‍ॅड. पारोमिताताई गोस्वामी यांनी दिला आहे. 
२ जुलै २०१८ रोजीच संचालक मंडळाने भरती रद्द केली होती. तरीही १४ जुलै रोजी उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. २०१५ मध्ये सरळसेवा भरतीची जाहिरात काढण्यात आली. या भरतीच्या दुसर्या टप्प्यामध्ये गडचिरोली विभागातील १० व संपूर्ण महाराष्ट्रात २३३ आणि एकूण २  हजार ९८१ उमेदवार होते. २०१६  - १७ मध्ये सरळसेवा भरतीमधील कोकण विभागातील ९४५ उमेदवार होते. त्यांना २ जुलै २०१८ च्या संचालक मंडळाच्या बैठकीत नियुक्ती आदेश देण्यात आले. कोकण वगळता संपूर्ण राज्यातील २३३ व गडचिरोली विभागातील १० उमेदवारांना वैद्यकीय तपासणी पूर्ण केल्यानंतरही भरती अमान्य केली, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैद्यकीय तपासणी पूर्ण होवून ४ महिने पूर्ण झाल्यानंतर सबंधित विभागाला का कळविण्यात आले नाही व कोकण विभागातील ९४५ उमेदवारांना नियुक्ती दिल्या गेली मग विदर्भातीलच उमेदवारांवर अन्याय का करण्यात आला, असा प्रश्न अ‍ॅड. गोस्वामी यांनी उपस्थित केला आहे. यामुळे येत्या १५ दिवसात हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा राज्य परिवहन महामंडळ व परिवहन मंत्र्यांच्या विरोधात तिव्र आंदोलन करू, असा इशारा अ‍ॅड.  पारोमिताताई गोस्वामी यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-14


Related Photos