महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी १५ कोटी मंजूर


- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर विधानसभेतील बल्लारपूर, मुल आणि पोंभुर्णासाठी नगरविकास विभागाकडून नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी एकूण १५ कोटी रुपये मंजूर झालेले आहे. बल्लारपूर येथील स्व. सुषमा स्वराज महिला सक्षमीकरण सभागृहासाठी ११ कोटी ५० लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे. मुल नगर परिषद क्षेत्रात विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी २ कोटी रुपये तर पोंभुर्णा नगरपंचायत क्षेत्रात विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी १ कोटी ५० लक्ष रुपये असे एकूण १५ कोटी रुपये मंजूर झालेले आहे. मंजूर झालेल्या निधीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केलेले होता, त्यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे.

बल्लारपूर येथे सांस्कृतिक कार्यक्रम, महिला बचत गटांचे प्रशिक्षण, स्वयंरोजगारांचे प्रशिक्षण, विविध प्रदर्शनी व महिलांच्या सर्वंकष सशक्तीकरणासाठी उत्तम व्यवस्था व्हावी, याकरिता बल्लारपूर येथील महिलांनी सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी केली होती. त्या अनुषंगाने मुनगंटीवार यांनी पाठपुरावा करत लेखाशीर्ष ३६०४ १०१८ अंतर्गत बल्लारपूर येथे स्व. सुषमा स्वराज महिला सक्षमीकरण सभागृहाच्या बांधकामासाठी ११ कोटी ५० लक्ष रुपये मंजूर झालेले आहे.

मुल शहरातील विविध रस्त्याचे बांधकाम, रोडच्या बाजूचे लादीकरण, नाल्या बांधकाम करण्यासाठी २ कोटी रुपये मंजूर झालेले आहे. पोंभुर्णा शहरातील नाला खोलीकरण करण्यासाठी ३० लक्ष रुपये, पोंभुर्णा शहरातील लघु पाटबंधारे तलावाच्या दोन गेटचे बांधकाम करण्यासाठी ३० लक्ष रुपये, पोंभुर्णा शहरातील तलावाच्या बाजूच्या रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी ३० लक्ष रुपये, पोंभुर्णा ते चिंतलधाबा रस्त्यावरील नर्सन नाल्याचे खोलीकरण करण्यासाठी ३० लक्ष रुपये, पोंभुर्णा शहरातील अंतर्गत रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी ३० लक्ष रुपये असे पूर्ण पोंभुर्णा नगरपंचायत क्षेत्रातील कामांसाठी १ कोटी ५० लक्ष मंजूर करण्यात आले आहे.

बल्लारपूर विधानसभेतील प्रलंबीत मागण्या पूर्ण झाल्याने विकासासाठी कायम आग्रही असणारे जिल्हाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे बल्लारपूर, मुल, पोंभुर्णा येथील नागरिकांनी आभार मानले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos