दोन हजारांची लाच स्वीकारणारा वनविभागाचा लेखापाल एसीबीच्या जाळ्यात


- गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
शेतातील स्वमालकीचे सागवानी झाडे शेतातून घरी नेण्यासाठी पासींग हातोडा व वाहतूक परवाना मिळवून देण्यासाठी दोन हजार रूपयांची लाच स्वीकारणारा ब्रम्हपुरी येथील उपवनसंरक्षक कार्यालयातील लेखापाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला आहे. सदर कारवाई गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली आहे.
शशीकांत ओमप्रकाश घोनमोडे (४७) असे लाचखोर लेखापालाचे नाव आहे. तक्रारदार ब्रम्हपुरी तालुक्यातील नवखळा येथील रहिवासी असून त्याने अन्य एकाच्या मालकीच्या शेतातून सागवानी झाडे तोडून घरी नेण्यासाठी वाहतूक परवाना, पासींग हातोडा मिळविण्यासाठी शशीकांत घोनमोडे यांच्याकडे संपर्क केला होता. त्याने या कामासाठी दोन हजारांची लाच मागितली. याबाबत तक्रादाराने गडचिरोली येथील एसीबीकडे तक्रार दाखल केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने आज १३ डिसेंबर रोजी सापळा रचला. दरम्यान आरोपी शशीकांत घोनमोडे याने दोन हजारांची लाच स्वीकारली. यावरून ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुध्धलवार, पोलिस उपअधीक्षक विजय माहुलकर, पोलिस उपअधीक्षक मिलींद तोतरे, डी.एम. घुगे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक रवी राजुलवार, सहाय्यक फौजदार मोरेश्वर लाकडे, पोलिस हवालदार प्रमोद ढोरे, नथ्थु धोटे, सतिश कत्तीवार, सुधाकर दंडीकेवार, देवेंद्र लोनबले, महेश कुकुडकार, गणेश वासेकर, किशोर ठाकुर, सुभाष सालोटकर, महिला पोलिस शिपाई सोनी तावाडे, चालक शिपाई तुळशिराम नवघरे यांनी केली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-13


Related Photos