दुसरीही मुलगीच झाल्याचा राग, आई - वडिलांकडून दोन महिन्यांच्या मुलीचा थिमेट पाजून खून


वृत्तसंस्था / कोल्हापूर :  पहिली मुलगी असताना दुसरीही मुलगीच  झाल्यामुळे  चिडलेल्या आई आणि वडिलांनी पोटच्या दोन महिन्यांच्या मुलीला थेट थिमेट पाजून खून केला. याप्रकरणी  सावर्डी  (ता. शाहूवाडी) येथील जयश्री प्रकाश पाडवे (२१) व प्रकाश बंडू पाडवे (२८) या दोघांना शाहूवाडी पोलिसांनी  अटक केली. न्यायालयाने त्यांना १५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 
 पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार  प्रकाश पाडवे व जयश्री पाडवे या दांपत्याला पहिली प्रांजल ही दोन वर्षांची मुलगी आहे. त्यानंतर त्यांना दोन महिन्यांपूर्वी मुलगी झाली. पहिली मुलगी असतानाही पुन्हा दुसऱ्यांदा मुलगीच झाल्याने या दांपत्याने सिद्धीला मारण्याचा कट रचला.  ४ ऑक्‍टोबर रोजी घरातच सिद्धीला खाण्यातून थिमेट हा विषारी पदार्थ पाजला. आपल्या दोन महिन्यांच्या मुलीला काहीतरी झाल्याचे नाटक करत त्यांनी तिला दवाखान्यात नेले. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर सिद्धीचे शवविच्छेदन करण्याचे डॉक्‍टरांनी ठरविले; मात्र त्यावेळी मृत सिद्धीचे शवविच्छेदन करण्यास आई जयश्रीने विरोध केला. त्याच वेळी सर्वांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. स्वतः डॉक्‍टरांनी या वेळी याबाबत तक्रार दिली.
थिमेटचा पुरावा मिळणार नाही यासाठी पाडवे दांपत्याने चांगली खबरदारी घेतली; पण अखेर कोल्हापूर येथून आलेल्या फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात थिमेट हा विषारी पदार्थच सिद्धीच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे  पाडवे दांपत्याविरोधात शाहूवाडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला. याबाबतची तक्रार शाहूवाडीचे पोलिस उपनिरीक्षक मतादेव जठार यांनी दिली. पोलिस निरीक्षक मनोहर रानमाळे, पोलिस हवालदार धनाजी सराटे, भरत मोळके, पुष्पा कळके यांच्या पथकाने या प्रकरणाची चौकशी केली.  Print


News - Rajy | Posted : 2018-12-13


Related Photos