भामरागड तहसील कार्यालयावर धडकला महामोर्चा, विविध मागण्यांचे दिले निवेदन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
भामरागड पट्टीतील ग्रामसभा व पारंपारिक गोटूल समिती तसेच सर्व जनतेच्या वतीने भामरागड तहसील कार्यालयावर भव्य महामोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरूवात अगरबत्ती प्रकल्प हेकमलकसा पासून करण्यात आली. मोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर तहसीलदार कैलाश अंडील यांना निवेदन देण्यात आले.
मोर्चाचे नेतृत्व जि.प. सदस्य अ‍ॅड.  लालसू नोगोटी, पंचायत समिती सभापती सुखराम मडावी, पं.स. उपसभापती प्रेमिला कुडयामी,रमेश पुंगाटी, लक्ष्मीकांत बोगामी, गोई कोडापे तसेच तालुक्यातील ग्रामसभांचे अध्यक्ष, सचिव व सदस्यांनी केले. 
जिल्ह्यात दुष्काळ जाहिर करण्यात यावा,  शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करण्यात यावे, वयक्तिक किंवा सामुहिक विकास कामांच्या योजनांचे अंदाजपत्रक ग्रामसभांकडे जमा करण्यात यावे, अतिक्रमणधारक शेतकर्यांना वनजमीनीचे पट्टे सातबारा सह देण्यात यावे, भामरागड तालुक्याच्या भौगोलिक दृष्टी नुसार नद्यांपासून विद्युत पुरवठा करून उपसा सिंचनाची सोय करण्यात यावी, गडचिरोली जिल्ह्यातील पाच. वर्षांपासून थकीत असलेली शिष्यवृत्ती देण्यात यावी, नक्षल सप्ताहादरम्यान ग्रामस्थांना पोलिस ठाण्यात जमा करणे थांबवावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 
मोर्चादरम्यान उपविभागीय पोलिस  अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनात भामरागड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेश मदने यांच्या नेतृत्वात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-12


Related Photos