पेटीएम द्वारे झालेल्या फसवणुकीतील ५० हजार रूपये मिळाले परत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा :
ऑनलाईन व्यवहार करतांना व्यवहार रद्द झाल्याचा संदेश आला. यानंतरही ५० हजार रूपये खात्यातून कमी झाले. याप्रकरणी फसवणूक झाल्याची तक्रार करताच स्थानिक गुन्हे शाखेने पत्रव्यवहार करून ग्राहकाला ५० हजार रूपयांची रक्कम परत मिळवून दिली आहे.
२४ नोव्हेंबर रोजी मनोजकुमार पनपालिया यांनी पेटीएम द्वारे टीव्हीएस ज्युपीटर दुचाकी बुक केली होती. यासाठी १ हजार ३०० रूपयांची ऑफर देण्यात आली होती. तसेच. प्रत्येकी दोन महिन्याला १ हजार ५०० रूपये इलेक्टीक बिलावर सुट अशी ऑफर देण्यात आली होती. तक्रारदार पनपालिया हे स्वतः टीव्हीएस कंपनीचे डिलर असल्याने त्यांनी पेटीएमद्वारे २१ नोव्हेंबर रोजी टीव्हीएस ज्युपीटर ही दुचाकी बुक केली होती. त्यांनी व्यवहार केल्यावर व्यवहार अयशस्वी झाल्याचा संदेश आला. यानंतर त्यांच्या भ्रमणध्वनीवर ५० हजार रूपये खात्यातून कमी झाल्याचा संदेश आला. याबाबत त्यांनी फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनात सायबर पोलिस ठाण्यातर्फे स्टेट बॅंक ऑफ इंडीया व पेटीएम वाॅलेट यांच्याकडे ई मेलद्वारे पत्रव्यवहार केला. सदर रक्कम कोणत्या खात्यात जमा झाली किंवा कोणाकडून फसवणूक करण्यात आली याबाबत माहिती काढण्यात आली. 
पेटीएम द्वारे मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर रक्कम त्यांच्यापर्यंत पोहचली नव्हती तर बॅंकेच्या शाखेप्रमाणे त्यांच्याकडून रक्कम एका ऑनलाईन वॅलेटला वळती झाली होती. यामुळे सायबर सेल वर्धाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याअंती पेटीएम वॅलेट तर्फे तक्रारदाराची संपूर्ण रक्कम परत करण्यात आली. 
सदर कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनात नापोशि अक्षय राउत, कुलदीप टांकसाळे, दिनेश बोथकर, निलेश कट्टोजवार, अनुप कावळे, पोलिस शिपाई अभिजित वाघमारे यांच्या पथकाने केली आहे.

   Print


News - Wardha | Posted : 2018-12-12


Related Photos