महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली : आदिवासी वर वधुंचा सामूहिक विवाह सोहळा पार पडणार


- गडचिरोली जिल्हा पोलीस व मैत्री परिवार संस्था नागपूर यांच्यावतीने आयोजीत   

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकी आणि मैत्री परिवार संस्था नागपूर व गडचिरोली शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २६ मार्च २०२३ रोजी गडचिरोली येथे भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर रोडवरील अभिनव लॉन येथे सकाळी १०:०० वा. होणाऱ्या या विवाह सोहळ्यात आत्मसमर्पण केलेल्या ०८ नक्षलवाद्यांसह दुर्गम अतिदुर्गम भागातील १२७ आदिवासी तरुण-तरुणी या विवाह सोहळ्यात विवाहबद्ध होणार आहेत.

पोलीस दादालोरा खिडकी मागील अनेक वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. आदिवासी बांधवांची भयग्रस्त वातावरणातून मुक्तता करणे त्यांनी सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचे प्रयत्न पालीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून केले जातात. सामूहिक विवाह सोहळा देखिल त्याच शृंखलेतील एक उपक्रम आहे.

२०१८ सालापासून हा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करतो आहे. अहेरी व गडचिरोली येथे झालेल्या या विवाह सोहळ्यात आतापर्यंत १५ आत्मसमर्पित नक्षल जोडप्यांसह एकुण ४३३ आदिवासी युवक-युवतींचे विवाह पार पडले. यंदाचा हा चौथा सामूहिक विवाह सोहळा आहे.

पोलीस दादालोरा खिडकी मागील दोन महिण्यांपासून या सामूहिक विवाह सोहळ्याच्या तयारीसाठी काम करते आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सुरुवातीला गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुक्यातील विवाह इच्छुक जोडप्यांचा शोध घेण्यात आला व त्यांची यादी तयार करण्यात आली. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी युवक-युवतींच्या संरक्षणाची मोठी जबाबदारी पोलीस विभागावर असते. यावर्षी ०८ आत्मसमर्पण केलेल्या युवक-युवतींचा विवाह लावून देणे ही पोलीस विभागाची मोठी उपलब्धी ठरणार आहे.

सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन गडचिरोली पोलीस दल व मैत्री परिवार संस्थेच्या नागपूर व गडचिरोली शाखेच्या वतीने केले जाते. यावर्षीचा विवाह सोहळा अधिक शानदार आणि भव्य व्हावा, यासाठी पोलीस विभाग व मैत्री परिवार संस्थेचे कार्यकर्ते समर्पित भावनेने कार्य करीत आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos