महत्वाच्या बातम्या

  बोगस खते, बी-बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्या आणि विक्रेत्यांविरुद्ध कडक कार्यवाही : कृषिमंत्री अब्दुल सत्तार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था /  मुंबई : बोगस खते, बियाणे आणि किटकनाशके यांची विक्री करुन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध आणि विक्रेत्यांविरुद्ध कडक कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहे. याप्रकरणात कोणाचाही सहभाग असला तरी त्याच्यावर कारवाई करण्यात येईल,  अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेत दिली.सदस्य अब्दुल्लाखान दुर्राणी यांनी यासंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री सत्तार म्हणाले की, राज्यात विविध ठिकाणी आठशेहून अधिक खत विक्री दुकानांची तपासणी करण्यात आली. तेथील 51 हजार 844 नमुने तपासण्यात आले.  याप्रकरणात 962 दावे दाखल करण्यात आले असून 77 पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या तपासणीत 76 परवाने रद्द करण्यात आले तर 53 दुकानांना विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. राज्यात या तपासणीत 6 कोटी 33 लाख रुपयांचा बोगस खते, बी-बियाणे यांचा 2 हजार 365 मेट्रीक टन साठा जप्त करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

परभणी येथे बोगस खत विक्री प्रकरणी संबंधीत गुजरातमधील कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत. याशिवाय, जिल्ह्यात एकूण 78 विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दोषी आढळलेल्या 8 खत विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहितीही मंत्री सत्तार यांनी यावेळी दिली. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य शशिकांत शिंदे यांनी उपप्रश्न उपस्थित केले. 





  Print






News - Rajy




Related Photos