नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातर्फे विद्यार्थ्यांसाठी सफारी शुल्कात सवलत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया :
शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थी हे देशाची जबाबदार पिढी म्हणून मोठी होणार असते. त्यांना निसर्ग संवर्धनाच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव व आपल्या देशाच्या निसर्ग वारसाची ओळख होणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पास भेटी देवून व्याघ्र व वन्यजीव संवर्धनाचे महत्व समजून घ्यावे तसेच विविध वन्यप्राण्यांची व वनस्पतीची माहिती जाणून घ्यावी या उद्देशाने नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्प शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सहलीत उपस्थित शिक्षकांकरीता अटी व शर्तीच्या अधिन राहून सफारी शुल्कात सवलत जाहिर करण्यात आली आहे.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील शाळा/महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना ७५ टक्के सवलत राहील. गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील बफर क्षेत्राबाहेरील शाळा / महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलत राहील. महाराष्ट्रातील गोंदिया व भंडारा जिल्हा वगळून इतर जिल्ह्यातील शाळा/महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना २५ टक्के सवलत राहील. मुख्याध्यापकांच्या दिलेल्या पत्रावरच ही सवलत लागू राहील. शालेय / महाविद्यालयीन सहलीतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलत मिळेल. एकट्या-दुकट्या आपल्या कुटूंबासोबत येणाऱ्या मुलांना ही सवलत लागू असणार नाही. शाळेचे वाहन हे २५ आसन क्षमतेपेक्षा जास्त मोठे असू नये. व्याघ्र प्रकल्पात जास्तीत जास्त २५ आसनक्षमता असलेल्या बसला परवानगी आहे यांची नोंद घ्यावी. वाहनाचे शुल्क व निसर्ग मार्गदर्शकांचे (Eco- Guide) शुल्कामध्ये कोणतीही सवलत असणार नाही. 
सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना निसर्ग व पर्यावरणाचे चित्रपट दाखविण्याची सोय ‘नागझिरा संकुल’ व ‘अरण्यवाचन’ नवेगावबांध येथे उपलब्ध आहे. आपल्याकडून आगावूमध्ये मागणी केल्यास वन विभागाकडून व्याघ्र प्रकल्पांची माहिती/सादरीकरणांसाठी वन अधिकारी उपलब्ध करुन देण्यात येईल. निसर्ग पर्यटनासाठी लागू असलेले सर्व नियम आपणास लागू राहतील. आपण आरक्षण हे ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पध्दतीने करु शकता. आपणास व्याघ्र प्रकल्पात प्रवेश हा सध्याची वाहन क्षमतेच्या अधीन राहूनच घ्यावयाचा आहे. याकरीता कोणताही वेगळा आरक्षीत कोटा नाही. तेव्हा जास्तीत जास्त शाळांनी व विद्यार्थ्यांनी या सवलतीचा फायदा घेवून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, गोंदिया यांनी केले आहे.  Print


News - Gondia | Posted : 2018-12-11


Related Photos