महत्वाच्या बातम्या

 पोंभुर्णा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या इमारतीचा मार्ग मोकळा


- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अथक परिश्रमाचे फलित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर विधानसभा अंतर्गत येणाऱ्या पोंभुर्णा येथे जागेअभावी खोळंबून असलेल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय इमारतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अथक परिश्रमामुळे कृषी अधिकारी कार्यालयासाठी ०.२४ हेक्टर आर. जमीन उपलब्ध झाली आहे. 

मध्यंतरीच्या काळात हे काम रखडले होते. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने पोंभुर्णा तालुका कृषी अधिकारी कार्यालय बांधकामासाठी २ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२२- २३ अंतर्गत सदर कृषी अधिकारी कार्यालय बांधकामासाठी २ कोटी ५० लक्ष रुपयांच्या निधीला २२ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या आदेशानुसार प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती.

पोंभुर्णा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची स्वतंत्र इमारत नसल्याने गैरसोयीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत होता. पोंभुर्णा तालुक्यात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. या तालुक्यातील शेतकरी बांधवांना शेती विषयक कामांसाठी सतत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जावे लागते. स्वतंत्र इमारत नसल्याने या कार्यालयात येणाऱ्या शेतकरी बांधवांची गैरसोय होत होती. 

शेतकरी बांधवांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे इमारत बांधकामासंदर्भात मागणी केली होती. मुनगंटीवार यांनी शेतकरी बांधवांना कृषी अधिकारी कार्यालय बांधकामासाठी निधी तातडीने मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. शेतकरी बांधवांना दिलेला शब्द सुधीर मुनगंटीवार यांनी पूर्ण केला. मात्र मध्यंतरीच्या काळात या इमारतीचे बांधकाम जागा नसल्याने खोळंबले होते. 

सुधीर मुनगंटीवार यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा मुद्दा पुन्हा युद्धस्तरावर हाती घेतला. त्यामुळे आता या कार्यालयाला जमिनीची उपलब्धता झाली आहे. प्रस्तावित कार्यालयाच्या स्वतंत्र इमारतीच्या माध्यमातून आता प्रशासकीय कामकाज वेगाने होण्याचा मार्ग सुकर व सुलभ झाला आहे. याशिवाय कृषी विभागालाही सुसज्ज इमारत मिळणार आहे. त्यामुळे पोंभुर्णा तालुक्यातील जनतेकडून सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos