महत्वाच्या बातम्या

 मिरचीवरील चुरडा मुरडा रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : मिरची पिकावर मोठया प्रमाणात फुलकिडीचा प्रादुर्भाव आढळून आला असून चुरडा मुरडा या विषाणुजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर दिसून आला. या रोगामुळे पानावर पिवळसर व हिरव्या रंगाचे चट्टे पडतात व झाडाची पाने बारीक, वेडीवाकडी होतात. अशा पानांचा गुच्छा होऊन रोगट फांदीला झुपक्याचा आकार येतो. नवीन फुटीचे छोटया पानांत रूपांतर होऊन गुच्छासारखे दिसतात. त्यामुळे, झाडाची वाढ खुंटते व उत्पादनात ४० ते ५० टक्केपर्यंत घट होऊ शकते. या रोगाचा प्रसार मावा, फुलकिडे, पांढरी माशी व कोळी या रस शोषणाऱ्या किडीमुळे होतो. सद्यस्थितीमध्ये मिरची पिकावर मोठया प्रमाणात फुलकिडयांचा प्रादुर्भाव असुन काही ठिकाणी कोळी या किडीचासुध्दा प्रादुर्भाव आला आहे.

फुलकिडे : ही किड अतिशय सुक्ष्म असुन तिचे शरीर लांबट आकाराचे असते. किड पानावर तसेच फळावर पेशी खरवडुन त्यातुन निघालेला रस शोषुन घेते. त्यामुळे पाने वेडीवाकडी होतात. तर फळावर खरवडल्यासारखे चट्टे दिसतात व फळे कडक होतात. तसेच झाडाची वाढ थांबुन पाने व कळयांची गळ होते.

कोळी : ही अष्टपाद वर्गातील किड असुन आकाराने अतिशय सुक्ष्म असते. पिवळसर रंगाचे कोळी पानावर राहुन रस शोषुन घेतात. प्रादुर्भावग्रस्त झाडाची पाने खालच्या दिशेने वाकडी होतात. जास्त प्रदुर्भाव असल्यास झाडाची वाढ खुंटते तसेच फुले व कळया गळण्याचे प्रमाण वाढते.

किडीच्या व्यवस्थापनासाठी एकीकृत व्यवस्थापनाच्या उपाययोजना : एरंडी तेल किंवा कोणत्याही चिकटसर तेलामधे ५ ते ७ मिटर सुती कापड उदा. सुती धोतर किंवा लुगडे (शक्यतोवर निळया रंगाचे) भिजवुन व त्यानंतर घट्ट पिळुन दोन काडयांच्या सहाय्याने मिरची पिकावर झाडाच्या बुंध्यापर्यंत ओळीने फिरविणे. जेणेकरून, फुलकिडे, कोळी सुती कापडाला चिकटतील अशाप्रकारे उपरोक्त किडी संपूर्ण कापडाला चिकटल्यावर सुती कापड, साबणाचा चुरा किंवा पावडर पाण्यात मिसळुन केलेल्या द्रावणात धुवुन घट्ट पिळणे. पुन्हा एरंडीचे तेल किंवा कोणतेही चिकटसर तेलामधे बुडवुन उरलेल्या ओळीमध्ये वरीलप्रमाणे फिरविणे जेणेकरून, झाडावरील फुलकिडे तसेच कोळी यांची संख्या कमी करण्यास मदत होईल. निळ्या रंगाचे चिकट सापळे ३०-४० प्रति एकर लावावे. जेणेकरून, फुलकिडयांची संख्या कमी करण्यास मदत होईल. सदर दोन्ही उपाय शक्यतोवर एकाच दिवशी केल्याने किडींची संख्या आटोक्यात येण्यास मदत होईल.  

किड व रोगाच्या व्यवस्थापनासाठी करा फवारणी : रस शोषणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनाकरीता लगेच दुसऱ्या दिवशी वनस्पतीजन्य किटकनाशक उदा. निंबोळी अर्क ५ टक्के किंवा ॲझोडेरॅक्टीन ३०० पी.पी.एम. ५० मि.ली. किंवा ॲझोडेरॅक्टीन १ हजार ५०० पी.पी.एम. ३० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. रस शोषण करणा-या फुलकिडयांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तसेच मिरची पिकामध्ये वारंवार पाण्याच्या पाळ्या देत असल्यामुळे जमिनीवर ओलावा कायम राहतो व आद्रता निर्माण होण्यास मदत होते. अशावेळी जैविक बुरशीनाशक व्हर्टिसिलीयम लेक्यानी या जैविक बुरशीनाशकाची ४०-५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. वनस्पतीजन्य किटकनाशकाच्या फवारणीनंतर गरज भासल्यास एका आठवडयांनी  किटकनाशकांची फवारणी करावी. यामध्ये, डायमोथोएट ३० टक्के ईसी २० मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट ०.५ टक्के एसजी ४ ग्रॅम किंवा फेनप्रोपॅथ्रीन ३० टक्के ईसी ७ मिली किंवा लॅगडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के सीएस ६ मिली किंवा इथिऑन ५० टक्के ईसी ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

या किटकनाशकाची फवारणी नंतरही किड नियंत्रणात येत नसल्यास खालील मिश्र किटकनाशकांची फवारणी करावी. यामध्ये इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के डब्ल्यू / डब्ल्यु + लुफेन्युरॉन ४० टक्के डब्ल्यू / डब्ल्यू डब्ल्युजी १.५ ग्रॅम किंवा फिप्रोनील ७ टक्के + हेक्झीथायझॅक्स ०.२ डब्ल्यू / डब्ल्यू एससी २० मिली किंवा प्रोफॅनोफॉक्स ४० टक्के + फेनपायरॉक्सीमेट २.५० डब्ल्यू / डब्ल्य ईसी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फुलकिडे या एकाच किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव असल्यास खालीलपैकी एका मिश्र किटकनाशकाची फवारणी करावी. थायोमियोक्झाम १२.६ टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के झेड.सी. ३ मि.ली. किंवा फलुर्बेडामाईड १९.९२ टक्के + थायक्लोप्रीड १९.९२ टक्के ५ मि.ली. किंवा इंडोक्झाकार्ब १४.५ टक्के + ॲसिटॅमीप्रीड ७.७  ए.सी. १० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.

शेतकरी बंधुनी पावर स्प्रेअरने फवारणी करतांना औषधाची मात्रा अडीचपट करावी. प्रत्येक रासायनीक फवारणीच्या वेळेस २५-३० ग्रॅम सल्फर ८० टक्के डब्ल्यु.पी. मिसळुन फवारणी करावी. जेणेकरून, कोळी या किडीचे तसेच भुरी या रोगाचे नियंत्रण करण्यास मदत होईल. फवारणी शक्यतो सकाळी ६ ते १० किंवा सायंकाळी ३ ते ६ च्या दरम्यान करावी व फवारणी  पानाच्या  खालच्या बाजुंनी करावी. सतत एकच एक किटकनाशक पुन्हा पुन्हा न वापरता आलटुन पालटुन वापरावे. असे कृषी विभागाने कळविले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos