शिर्डी येथे १०, ११ व १२ डिसेंबरला शेतकरी संघटनेचे १४ वे संयुक्त अधिवेशन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / राजुरा : 
अहमदनगर जिल्हयातील श्रीक्षेत्र शिर्डी येथे  १०, ११ व १२ डिसेंबर २०१८ ला शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी व शेतकरी युवा आघाडीचे १४ वे संयुक्त अधिवेशन आयोजीत करण्यात आले आहे. " समृध्द शेतकरी...समर्थ भारत - इंडिया " असे या अधिवेशनाचे ब्रिदवाक्य असुन या राष्ट्रव्यापी अधिवेशनाला मोठ्या संख्येने शेतकरी व नागरीकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेने केले आहे.
या अधिवेशनाचे उदघाटन १० डिसेंबरला दुपारी १२ वाजता होणार असुन प्रथम दोन दिवस प्रतिनिधी संमेलन आणि तिस-या दिवशी १२ डिसेंबरला दुपारी १२ वाजता खुले अधिवेशन होणार आहे. देशात अर्थव्यवस्थेबद्दल जेव्हा गंभीर प्रश्न निर्माण होतात, तेव्हा या प्रश्नांनर देशातील तज्ञ,मार्गदर्शक व शेतकरी विचारमंथन करुन उपाय शोधून पुढे शेतकरी चळवळीच्या वाटचालीची दिशा ठरविली जाते. माजी खासदार शरद जोशी प्रणित या संघटनेचे विस राज्यातील प्रतिनीधी या चर्चेत सहभागी होणार आहेत.
या अधिवेशनात शेतमालाचे किमान भाव, कोलमडून गेलेले जोडधंदे, आधुनिक व नविन तंत्रज्ञान वापरुन कर्जात बुडालेले तरुण, तोट्याचा शेतीव्यवसाय व तसा राहावा ही व्यवस्था, खेड्यातून शहराकडे होणारे स्थलांतरण, मंदावलेला व्यापार, बेरोजगारी,सरकारने तंत्रज्ञानाचे नाकारलेले स्वातंत्र्य, जागतिक बाजारपेठ स्पर्धेत मागे पडलेला भारतीय शेतकरी, युवकांपुढील समस्या, रुपयांचे अवमुल्यन, देशातील तिजोरीतील खडखडाट, शेतकरी विरोधी धोरणे व कायदे इत्यादीसह अनेक महत्वाच्या विषयांवर तज्ञ, मार्गदर्शक व प्रतिनिधी मते मांडणार असून त्यावर चर्चा होणार आहे आणि यासंदर्भात ठराव पारित होणार आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी स्व.शरद जोशी यांनी सुचविलेला " भारत उत्थान कार्यक्रम " यावर चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार आहे.
शेतक-यांच्या प्रश्नावर गांभीर्याने देशव्यापी चर्चा होऊन या कृषीप्रधान देशाचे कृषी धोरण जाहिर करावे, यासाठी दबावगट निर्माण करणे गरजेचे आहे. म्हणून सर्व भेद विसरुन सर्व धर्म व पक्षातील स्वतंत्रतावादी नागरीक शेतकरी, युवक यांनी हजारोंच्या संख्येत शिर्डी अधिवेशनाला उपस्थित राहावे, असे आवाहन जेष्ठ शेतकरी नेते माजी आमदार अँड. वामनराव चटप, अध्यक्ष अनिल घनवट, गंगाधर मुटे,सतिश दाणी, सरोज काशीकर, शैला देशपांडे, रवि काशिकर, गोविंद जोशी, प्रभाकर दिवे, अरुण पाटील नवले,अनिल ठाकुरवार,पोर्णिमा निरंजने, जोत्स्ना मोहितकर, अँड. श्रीनिवास मुसळे, तुकेश वानोडे,रामभाऊ पारखी, रघुनाथराव सहारे,दादाराव नवलाखे, श्रीधरराव बल्की, विजय निरंजने यांनी केले आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2018-12-09


Related Photos