चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आणखी एका वाघाचा मृत्यू


- चंद्रपूर जिल्ह्यात चाललंय तरी काय?
- मटकासूर वाघाचा विजेच्या प्रवाहाने मृत्यू 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रमोद राऊत / खडसंगी :
व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वार असलेल्या मोहर्ली गावापासून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या भामडेळी येथील एका शेतात ३ वर्ष वयाच्या  छोटे मटकासुर या युवा वाघाचा विजप्रवाहाच्या धक्क्याने मृत्यु झाला आहे. या घटनेमुळे वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे. 
 ताडोबाच्या बफर क्षेत्रात मागील दोन महिन्यांपासून फिरत कोकेवड गोसरी मार्गे हा वाघ भद्रावती इथे १ दिवस मुक्काम ठोकून होता.  काल भद्रावती येथून स्थलांतरीत होऊन आगरझरी गेट जवळ दिसल्याची चर्चा होती . तेथून  भामडेळी येथे आला. येथील जंगलालगत असलेल्या शेताजवळ जाताच त्याला विजेचा धक्का बसला. ऋषी ननावरे या शेतमालकाने वन्यजीवांपासून पीक वाचवण्यासाठी कुंपणाला विजेचा प्रवाह दिला होता. त्यात हा वाघ अडकला. ही घटना काल ८ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. मात्र भीतीपोटी त्यानं माहिती लपवून ठेवली. काल सायंकाळी ती वनविभागाला मिळाल्यावर सर्व अधिकारी घटनास्थळी पोचले. या प्रकरणी शेतमालकास ताब्यात घेण्यात आलं असून मोहर्ली येथील रोपवाटिकेत शवविच्छेदन करण्यात आले.
विशेष म्हणजे या वाघाला कॉलर आयडी लागलेली होती. त्यामुळे  त्याचे प्रत्येक लोकेशन वनविभागाला ठाऊक होते. असे असतानाही भली मोठी सुरक्षा यंत्रणा काय करीत होती, हा प्रश्नच आहे. ज्या भागात वाघाचं वास्तव्य आहे, त्या संपूर्ण भागाची पाहणी का केली गेली नाही, पीक शेतात असल्याने  वीजप्रवाह सोडला जातो, हे सर्वश्रुत असताना शेतांची पाहणी का केली गेली नाही, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. मागील महिन्यात यवतमाळ मधील अवनी चे प्रकरण गाजत असताना चंद्रपूर जवळ रेल्वेच्या धडकेने वाघाची तीन पिल्लं ठार झाली होती. त्यानंतर हा मोठा वाघ मरण पावल्याने वाघांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.   Print


News - Chandrapur | Posted : 2018-12-09


Related Photos