साईंचे दर्शन घेऊन मुंबईकडे जाणाऱ्या लक्झरी बसला मोठा अपघात ४ ठार , ४० जखमी


- वेगावर नियंत्रण न राहील्याने अपघात 
- जखमी मध्ये मुबंई, दिल्ली येथील प्रवासी 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 प्रतिनिधी / शिर्डी
: साईंचे दर्शन घेऊन  शिर्डीहून मुंबईकडे जाणार्‍या खासगी लक्‍झरी बसला इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख शिवारात भीषण अपघात झाला.  मुंबई-आग्रा महामार्गावर झालेल्या या अपघातात ४ जण ठार तर ४० जण जखमी झाले. प्राथमिक माहितीनुसार बसचालकाचे वेगावर नियंत्रण न राहिल्याने अपघात झाला असून जखमी आणि मृतांमध्ये दिल्ली, मुंबई येथील प्रवासी आहेत. जखमींना जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे नाशिककडे जाणारी वाहतूक तासभर विस्कळीत झाली. 
याबाबत अधिक माहिती अशी की, शिर्डी येथून साईबाबाचे दर्शन करून ५० प्रवासी क्षमतेची लक्झरी बस एमएच ०१ सीव्‍ही ९६७५ नाशिकडून मुंबईकडे जात होती. मुंबई आग्रा महामार्गावर संध्याकाळी ५.४५ वाजता इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख शिवारात अपघात झाला. भरधाव बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकावर जोरदार कोसळली. यानंतर २०० फूट फरफटत ही बस रस्त्यावर आदळली.  ह्या गंभीर अपघातात बसमधील ४ जण ठार तर ४० जण जखमी झाले. 
अपघात झाल्याचे समजताच नरेंद्र महाराज संस्थानचे रुग्णवाहक निवृत्ती गुंड, टोलनाका रुग्णवाहिका सेवेने जखमींना मदत करून रुग्णालयात दाखल केले. वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास सुरू केला आहे.

मुलाचा नवस फेडायला गेलेल्या  मुलाचाच मृत्यू

अपघातातील एका प्रवासी महिलेला ६ अपत्यांनंतर मला मुलगा होऊ दे म्हणुन साईबाबांना नवस केला होता.  नवसाने मुलगा म्हणून त्या मुलाचा नवस पूर्ण करण्यासाठी ही महिला बसने प्रवास करीत होती. मात्र ह्या अपघातात नवसाने झालेल्या ८ वर्षीय मुलाचा हृदयद्रावक मृत्यू झाला. यामुळे रडत असलेली त्याची माता पाहून नागरिकांनाही रडु अवरले नाही.   Print


News - Rajy | Posted : 2018-12-09


Related Photos