महत्वाच्या बातम्या

 वाढती महागाई, बेरोजगारीमुळे सर्वसामान्यांचे जीवन वेठीस : माजी मंत्री वडेट्टीवार 


- सिंगडझरी येथे जिल्हा परिषद गटांचा कार्यकर्ता संवाद मेळावा 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिंदेवाही : संपूर्ण देशात धर्मांधता पसरवून जाती-जातीत भांडणे लावण्याचे काम सुरू आहे. तर दुसरीकडे लोकशाहीच्या नीतीमूल्यातून सर्वांना समान हक्क देणाऱ्या संविधानालाही संपवण्याचा फार मोठा कट रचला जात आहे. आज सर्वत्र महागाई व बेरोजगारीमुळे देशभर होरपळतोय असे असतानाही केवळ पोकळ घोषणा व जुमलेबाजी करून सत्ताधारी दिशाभूल करत सर्वसामान्यांना व्यवसायिकांची गुलाम बनविण्याकडे प्रयत्नशील आहेत. या विरोधात ठोस पाऊल उचलणे काळाची गरज असून पक्ष संघटन वाढविण्यासाठी काँग्रेस पक्षाचे विचार घरा घरात पोहोचवा असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.

ते सिंगडझरी येथे आयोजित जिल्हा परिषद गटांच्या कार्यकर्ता संवाद मिळावा प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. तालुका काँग्रेस कमिटी सिंदेवाही तथा ग्राम काँग्रेस कमिटी वासेरा व सिंगडझरीच्या वतीने आयोजित जिल्हा परिषद गट कार्यकर्ता संवाद मेळाव्यास अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव गेडाम, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी तालुकाध्यक्ष अरुण कोलते, जिल्हा सरचिटणीस हरिभाऊ बारेकर तालुका अध्यक्ष रमाकांत लोधे, ग्राम काँग्रेस कमिटी अध्यक्ष परशुराम बोरकर, तालुका उपाध्यक्ष संजय गहाने, वीरेंद्र जयस्वाल, जगन कवठे, नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, उपनगराध्यक्ष मयूर सूचक, माजी प.स. सदस्य राहुल पोरेड्डीवार, नगरसेवक युनुस शेख, अभिमन्यू नैताम, तालुका महिला आघाडी अध्यक्ष सीमा सहारे ,रूपाचा ताडुरवार , नंदा नरसाळे, लता गेडाम प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री, आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यावर कर्जाचा डोंगर वाढत चाललेला असून नोकर भरतीच्या केवळ पोकळ घोषणा देत बेरोजगारांची थट्टा सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. काँग्रेस सरकारच्या काळात गॅस सिलेंडरचे दर दहा रुपयांनी महागले की विरोधक रस्त्यावर उतरून आंदोलने करायचे. आता मात्र गेल्या नऊ वर्षाच्या काळात गॅस सिलेंडरचे भाव तिपटीने वाढले असून सर्वसामान्य गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. राज्यातील शेतकऱ्यांची संख्या जवळपास दोन कोटीच्या घरात असताना केवळ मोजक्या शेतकऱ्यांना सन्मान निधी देऊन आम्हीच शेतकऱ्यांचे कैवारी असे दाखविले जात आहे.

आगामी काळात निवडणुका तोंडावर असल्याने घोषणांचा पाऊस पाडून जनसामान्यांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न सत्ताधार्यांकडून सुरू आहे. अशा पोकळ व थोतांड आश्वासनांना बळी न पडता देशासाठी बलिदान देणाऱ्या गांधी घराण्यातील युवा नेते राहुल गांधी यांच्या जागतिक विक्रमी भारत जोडो यात्रेतून प्रभावित होत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने सुरू केलेल्या हाथ से हाथ जोडो या अभियानातून जनसामान्यांपर्यंत पोहोचून पक्ष संघटन वाढवण्यास कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सोबतच वासेरा - मोहाडी (नले.) व शिवणी - सरडपार या दोन्ही जिल्हा परिषद गटांमध्ये पार पडलेल्या ग्रामीण रस्ते, पूल, पाणी पुरवठा योजना, शेती सिंचन, शिक्षण, आरोग्य, विकास कामांची माहिती उपस्थित त्यांना दिली. तद्वतच  वासेरा येथील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे स्मारक उभारणार असे आश्वासनही यावेळी दिले. कार्यक्रमास दोन्ही जिल्हा परिषद गटातील हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos