महत्वाच्या बातम्या

 देसाईगंज शहरातील आंबेडकर विद्यालयाजवळ खड्ड्यात हरविला रस्ता



- नगर परिषदेसह सार्वजनिक बांधकाम विभागाचेही दुर्लक्ष : अपघाताची शक्यता बळावली

विदर्भ न्यूज एक्सप्रेस

तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : डॉ. आंबेडकर शाळेलगत प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ४१ वर जड वाहतूक व सततच्या पावसामुळे शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ मोठमोठे खड्डे पडले असून विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रोडची इतकी दुर्दशा झालेली आहे की वाहनचालक, दुचाकीस्वारांना आपला जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. काहींनी तर आपला मार्ग चक्क शाळेच्या पटांगणातूनच बनवलेला आहे. देसाईगंज न. प. प्रशासनाने रेल्वे लगत महामार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून आज एक वर्ष पूर्ण होत आले असून अजूनही काम अपूर्णच आहे; मात्र जड वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था न करता आंबेडकर शाळेलगत प्रजिमा ४१ वळणमार्गावरून वाहतूक सुरू केल्याने सदर रोडची खूपच दयनीय अवस्था झालेली आहे. सदर रोडच्या दुरुस्तीबाबत विचारणा केली असता नगर परिषद देसाईगंजने सदर रोड त्यांच्या अखत्यारीत येत नसल्याचा तर सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी नसल्याच्या कारणावरून रोडच्या दुरुस्तीबाबत नकार दर्शविला आहे. अशा परिस्थितीत जनतेने व खास करून विद्यार्थ्यांनी कोणाकडे न्याय मागावा ? या विवंचनेत शाळा प्रशासन व नागरिक सापडले आहेत.सदर रोड जड वाहतुकीसाठीच नाही, परंतु या रस्त्यावरुन जड वाहतूक केली जात आहे. एवढेच नव्हे तर किरकोळ वाहतुकीसाठीही सदर रस्ता एवढा धोकादायक झालेला आहे की कोणत्याही वेळेला अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर रोडच्या दुरुस्तीबाबत वारंवार निवेदने देऊनही कोणीही लक्ष देण्याच्या मनस्थितीत दिसून येत नाही. पावसामध्ये चिखल व खड्ड्यांचा त्रास तर कोरड्या वातावरणामध्ये वाहतुकीबरोबर रोडची संपूर्ण धूळ शाळेच्या आवारात व वर्ग खोल्यांमध्ये घुसत असल्याने विद्यार्थी व शिक्षकांना या नवीन त्रासाला सामोरे जावे लागत आहे.सदर रोडचे डांबरीकरण करावे व शाळेच्या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी विनंती पालकवर्ग व विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास विद्यार्थ्यासह रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही पालकवर्ग व विद्यार्थ्याकडून दिला जात आहे. प्रशासनाने दखल घेणे गरजेचे बनले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos