महत्वाच्या बातम्या

 सेवानिवृत्त शिक्षकाची ग्राम दारुमुक्तीसाठी सेकंड इनिंगची सुरुवात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिंदेवाही : मानवी जीवनात अनेक वेळा सुरुवात करण्याचे क्षण येतात. लहानपणी अन्नाचा घास भरवायचा म्हणजे दुधापासुन फारकत घ्यायची सुरुवात. पुढे बालवाडीत जाण्याची सुरुवात. त्यानंतर शाळेत, काॅलेजात, संसारात, नोकरी, व्यवसायात आणि शेवटी सेवानिवृत्तीची सुरुवात. नव्या जीवनाची सुरुवात हा शब्द फसवा आहे. खरं म्हणजे आता यापुढे खडतर आयुष्याची सुरुवात आहे. आतापर्यंत तुम्ही सगळ्यांसाठी जगलात. आता यापुढे तुम्हाला तुमच्यासाठी जगायचे आहे. असाहाय्य, कमजोर झाल्यामुळे तुम्हाला सक्तीची, कायमची रजा देण्यात आली आहे हे समजायला कठीण जाते पण तेच वास्तव असते. हे पुढील काही दिवसांनी सगळ्यांच्या वागण्यातुन मात्र त्या व्यक्तीला जाणवते. परंतु या विचारांना बगल देत ध्येयवेडे रतन कोवे यांनी स्वतःला लोकसेवेत झोकुन दिले. आणि आयुष्याची सेकंड इनिंग सुरु केली.

लहाणपणा पासुनच संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रभाव गुरुजीवर राहीला आहे. शिक्षकी पेशामध्ये असतांना सुध्दा ते प्रार्थना मंदिरात जावुन ध्यान साधना, प्रवचन, किर्तन करायचे. त्यांचे मुळगाव सिंदेवाही तालुक्यातील वासेरा हे आहे. वासेरा येथे १६ ते १८ युवक व नागरिक दारू मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. यांचा दोन महिण्यापासुन प्रवास सुरु आहे. पहाटे ४ वाजता पासुन या सर्वांची दैनंदिनी सुरु होते. हिवाळ्यात सुध्दा थंड पाण्याने आंघोळ करुन दुध नास्ता करुन ५ वाजता गावातील प्रमुख मार्गावर फेरी काढण्यात येते. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भजने म्हणत प्रार्थना मंदिरात जावुन ध्यानसाधना करण्यात येते.

हाच कार्यक्रम सायंकाळी पण फेरी काढुन घेण्यात येतो. जे सकाळ दुपार सायंकाळ अट्टल मद्यपान करणारे होते ते बंगाली व धोतर, भगवी टोपी लावुन फेरीत मार्गस्थ होतांना दिसत आहेत. गुरुजी प्रत्येक समाजातील चौकात त्या त्या धर्माचे गाणे व भजने म्हणत नविन मद्यपान करणार्याबद्दल माहिती घेत असतात. त्याचे मन वळले नाहीतर त्याच्या घरी जावुन चौकशी व हात पाय दाबुन देवुन सेवा करतात, समज देतात. व गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रार्थना मंदिरात पहाटे येण्याचे सांगतात. यात काही अपवाद देखील आहेत. गुरुजी सोबत फिरुन पुन्हा काही लोक व्यसनेधीनतेकडे गेले आहेत तरी त्यांना वठनीवर आणण्यासाठी तसे प्रयत्न सुरु आहेत.

त्यांच्या खिशात गुळ व शेंगदाणे ठेवुन खाण्यासाठी सांगत आहेत. सकाळी व सायंकाळी दुध व नास्ता सुरु आहे. हा सर्व खर्च गुरुजी स्वतःच्या खिशातुन करीत आहेत. गुरुजींचा पेहराव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासारखाच आहे. काठी, धोतर, बंगाली व भगवी टोपी लावुनच ते गावात व सिन्देवाही येथे फिरत असतात. आज त्यांच्या या प्रयत्नांना ३ महिने होत आहेत. तरी गुरुजीनी सेवा सोडली नाही. काही निवडक लोकांना मोझरी येथे पाठविण्याचा त्यांचा मानस आहे. या उपक्रमाला गावातुन उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होवुन वासेरा येथे आपल्या मुळ गावी ही सेकंड इनिंग सुरु करण्याअगोदर गुरुजी सिन्देवाही येथे पहाटे पाच वाजता व सायंकाळी सात वाजता प्रभोदनात्मक भजन म्हणत फिरायचे. कित्येकदा पोलिसांनी त्यांना पकडले आहे. पण नंतर ते एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत असे माहीत झाल्यावर त्यांना सोडुन देण्यात येत होते. या कार्यासाठी गुरुजींनी गुजरात येथुन मेहसाना येथील केन्द्रावरुन विपश्यना शिबीर केले आहे.

गुरुजी आपला अनुभव सांगतांना म्हणत असतात की या व्यसनेधीनतेकडे मी पण वळलो होतो. पण गेल्या १० वर्षापासून ते अलिप्त झाले आहेत. यामुळे घरी भांडणे व कलह निर्माण होत होता. या अनुभवातून गुरुजीनी हा पवित्रा घेतला. समाजाला व्यसनमुक्तीकडे नेण्यासाठी त्यांनी विडाच उचलला आहे. स्वतःला सिद्धार्थ गौतम बुद्ध, तुकडोजी महाराज, पाचलेगावकर महाराज, बाबासाहेब आंबेडकर, गाडगेबाबा यांच्या विचारांचे ज्ञान आत्मसात करुन समाजाला ते विचार आत्मसात करायची गरज आहे असे सांगत असतात.





  Print






News - Chandrapur




Related Photos