महत्वाच्या बातम्या

 जालना येथे बियाणे पार्क उभारतांना लहान कंपन्यांनाही प्रोत्साहन देणार : कृषी मंत्री अब्दुल सत्तार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : राज्यात बियाणे उत्पादन क्षेत्रात पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी जालना येथे बियाणे पार्क उभारण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी एमआयडीसीची जागा उपलब्ध आहे. याअंतर्गत लहान कंपन्यांना सुद्धा उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने कृषी विभागाच्या जागेवर सवलतीच्या दरात जागा देता येईल का, याबाबत विचार करणार असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेत याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री सत्तार म्हणाले की, जालना येथे बियाणे पार्क उभारण्याबाबत समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अधिक असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात देखील बियाणे पार्क उभारण्याबाबत समिती स्थापन करण्यात येईल, असेही त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

यासंदर्भात झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य ॲड. मनीषा कायंदे, वजाहत मिर्झा आदींनी सहभाग घेतला.






  Print






News - Rajy




Related Photos