दहावीचा बदललेला अभ्यासक्रम उद्यापासून बालभारतीच्या यु ट्युब वाहिनीवर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
विशेष प्रतिनिधी / अहेरी :
२०१८ - १९  या शैक्षणिक वर्षापासून दहावीचा अभ्यासक्रम बदलविण्यात आला आहे. बदललेला अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांस अनुसरून विद्यार्थ्यांना सराव होण्यासाठी महाराष्ट राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने नवीन प्रश्नसंचाच्या उत्तरपत्रिका मार्गदर्शनाबाबतचा व्हिडीओ बालभारतीच्या e balbharti या  यु ट्युब वाहिनीवर उद्या ६ डिसेंबर पासून उपलब्ध करून देणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम समजून घेणे सोयीचे होणार आहे.
अनेकदा बदललेल्या अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमावस्था असते. अनेकदा विद्यार्थी बदललेल्या अभ्यासक्रमामुळे चिंताग्रस्त असतात. यामुळे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने व्हिडीओ उपलब्ध करून देवून विद्यार्थ्यांना सरावाची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. 
बालभारती ने तयार केलेली पाठ्यपुस्तके तसेच मुल्यमापनासंदर्भातील नवीन केलेल्या कृतिपत्रीकांना अनुसरून मार्च २०१९ च्या शालांत परीक्षेत विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणार आहे. या बदललेल्या कृतिपत्रिकांना अनुसरून विद्यार्थ्यांच्या मनातील भिती दूर व्हावी, आत्मविश्वास निर्माण होवून विचारशक्तीला चालना मिळावी या हेतूने सराव प्रश्नसंच २६ नोव्हेंबरपासून पाठ्यपुस्तक महामंडळाच्या या www.ebalbharati.com  वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी सरावासाठी कृतिपत्रिका स्वतः सोडवायच्या असून तेथे आवश्यक शिक्षक, पालकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावयाचे आहे. सबंधित विषयाची कृतिपत्रिका प्रसिध्द झाल्यानंतर आता उद्या ६ डिसेंबरपासून यु ट्युब वाहिनीवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 
पाठ्यपुस्तक मंडळाच्या संचालकांनी सर्व विषयांच्या कृतिपत्रिका स्वरूपावर आधारित असा एक मार्गदर्शनपर व्हिडीओ तयार करून यु ट्युब वाहिनीवर दिला आहे. हा व्हिडीओ पाहून सब्सक्रिप्शन करावे. सराव कृतिपत्रिका संच उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यावर देण्यात आलेल्या कृतिपत्रिकांमध्ये समाविष्ट प्रश्नांच्या उत्तरांच्या संदर्भाने विषय तज्ञांचे मत व्यक्त करणारे व्हिडीओ दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी सोडवायची कृतिपत्रिका ही संक्षिप्त उत्तरपत्रिका, व्हिडीओ यांच्या माध्यमातून तपासून आपल्या झालेल्या चुका दुरूस्त करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयाचा सराव करायचा आहे.
सर्व विषयांचे व्हिडीओ उद्या ६ डिसेंबरपासून क्रमशः उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे व्हिडीओ यु ट्युबवरील ई बालभारती च्या वाहिनीवर पाहता येणार आहेत. यु ट्युब वाहिनीवर सब्सक्रिप्शन करून विद्यार्थी, पालक, शिक्षकांचे अभिप्राय नोंदविण्याची सुविधा असणार आहे. यामुळे व्हिडीओ पाहून अभिप्राय नोंदवावे, असे आवाहन पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक डाॅ. सुनिल मगर यांनी केले आहे.

   Print


News - Rajy | Posted : 2018-12-05


Related Photos