गोवर आणि रुबेला च्या लसीबाबत गैरसमज, ४१ शाळांचा लस देण्यासाठी नकार


वृत्तसंस्था / सोलापूर :  गोवर आणि रुबेला या आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागाकडून २७ नोव्हेंबरपासून राज्यभर व्यापक लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. मात्र  ही लस घेतल्याने नपुंसकत्व येते अशी चुकीची माहिती पसरली आहे. त्यामुळे आपल्या शाळेतील मुलांच्या आरोग्याला धोका उद्भवू नये या भितीने सोलापूरमधील ४१ शाळांनी ही लस  घेण्यास नकार दिला आहे.
राज्यभरातील सर्व शाळा आणि महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ही लस देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले होते. नऊ महिने ते १५ वर्षांपर्यंतच्या बालकांना ही लस द्यावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनीही केले होते. मात्र आता अचानक या लसीबाबत गैरसमज निर्माण झाल्याने  ४१ शाळांनी ही लस आपण आपल्या शाळेतील मुलांना देणार नसल्याचे सांगितले आहे. २ दिवसांपूर्वीपासून ही लस देणे धोकादायक असल्याच्या व्हिडियो क्लीप समाजमाध्यमांवर फीरत होत्या. त्यामुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र त्याही खोट्या असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या घटनांमुळे या लसीकरण मोहिमेला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.
या शाळांमध्ये मराठी तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा समावेश असून त्यांच्याशी आयुक्त चर्चा करणार असल्याची माहिती आहे. या लसीच्या संदर्भात असणारे गैरसमज दूर करण्यासाठी सोलापूरचे आयुक्त शाळांच्या मुख्याध्यापकांसोबत तातडीची बैठक घेणार आहेत. बैठकीच्या माध्यमातून यावर योग्य तो तोडगा काढला जाणार आहे. 
याबाबत  डॉ. दीपक सावंत म्हणाले, गोवर-रुबेला ही लस धोकादायक नाही, त्यामुळे पालकांनी अजिबात काळजी करु नये. आपली मुले ही आमची मुले आहेत, गोवर आणि रुबेलासारख्या गंभीर आजारांची लागण होऊ नये म्हणून ९ महिने ते १५ वर्षे वयाच्या मुलांना ही लस द्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.    Print


News - Rajy | Posted : 2018-12-05


Related Photos