७२ हजार पदांची मेगा भरती , प्रक्रिया पुन्हा सुरू


- मंत्रालयात खास ‘वॉर रूम’ 

- २८ फेब्रुवारीच्या आत पूर्ण करून देणार  नियुक्तीपत्रे 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई : 
मराठा समाजाच्या आरक्षणामुळे स्थगित करण्यात आलेली शासकीय सेवेतील ७२ हजार पदांची मेगाभरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे.  राज्याच्या विविध खात्यांमध्ये ७२ हजार पदांची भरती करण्याच्या दृष्टीने मुख्य सचिव पातळीवर बैठका सुरू झाल्या आहेत.  कोणत्याही परिस्थितीत ही भरती प्रक्रिया २८ फेब्रुवारीच्या आत पूर्ण करून नियुक्तीपत्रे देण्यात येतील.  वेगवेगळ्या विभागांशी समन्वय साधून या प्रक्रियेला चालना देण्यासाठी मंत्रालयात खास ‘वॉर रूम’ स्थापन करण्यात आली असल्याची  माहिती प्राप्त झाली आहे
७२ हजार पदांपैकी काही पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणार आहेत. जिल्हा स्तरावरील पदांचे प्रमाण जास्त आहे. जिल्हा निवड समित्यांमार्फत ही पदे भरली जातील. साधारणत: एका संवर्गासाठी एकच दिवस परीक्षा घेण्याचा विचार आहे. जिल्हा स्तरावर त्याचे वेळापत्रक तयार करण्यात येत आहे.  साधारणत: एप्रिल-मे मध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील. त्याची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ही मेगाभरती प्रक्रिया पूर्ण करायची आहे. परीक्षा, मुलाखती सर्व प्रक्रिया पार पडून निवड होणाऱ्या उमेदवारांना २८ फेब्रुवारीच्या आत नियुक्तीपत्रे हातात मिळतील आणि ते निवड झालेल्या जागी रुजू होतील, त्यादृष्टीने वेळापत्रक आखले जात आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच, मराठा आरक्षण लागू झाल्यामुळे विविध संवर्गातील बिंदूनामावली तपासणीचे काम सुरू असून त्यानंतर या पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील, असे मुख्य सचिवांनी सांगितले.


कोणत्या खात्यात किती जागा भरणार ?

ग्रामविकास विभाग  – 11,000
आरोग्य विभाग – 10,568
सार्वजनिक बांधकाम विभाग  – 8,337
जलसंपदा विभाग  – 8227
गृह विभाग  – 7,111
कृषी विभाग  – 2500
जलसंधारण विभाग  – 2,423
नगरविकास विभाग  – 1500
पशुसंवर्धन विभाग  – 1,047  Print


News - Rajy | Posted : 2018-12-05


Related Photos