महत्वाच्या बातम्या

 पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकांकरीता आवश्यक सुविधा उपलब्ध ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश


- ३० मार्चपर्यंत सुविधांचा फोटो अहवाल प्रमाणपत्रासह कार्यालयास सादर करण्याच्या सुचना

- अन्यथा कार्यालयाकडून देण्यात आलेले नाहरकत प्रमाणपत्र नियमानुसार रद्द करण्याची कार्यवाही

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकांकरीता व सामान्य नागरिकांकरीता मूळ आवश्यक सुविधा जसे, स्वच्छ पिण्याचे पाणी, वाहनाकरींता हवा भरण्याची नि:शुल्क सुविधा व स्वच्छ प्रसाधनगृहे आदी सुविधा उपलब्ध ठेवणे संदर्भीय पेट्रोलियम कंपन्यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बंधनकारक आहे. तथापि काही पेट्रोल पंप संचालक यांच्याकडून या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जात नाही. ज्यामध्ये प्रामुख्याने प्रसाधनगृहाची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे महिलांची गैरसोय होत असते. काही ठिकाणी अशा सुविधा पूर्णतः बंद स्थितीत आहेत तर काही ठिकाणी पूर्णतः उपलब्ध नसतात. काही ठिकाणी अशा सुविधा अंशत: उपलब्ध करून दिल्या जात असतात. मात्र, त्याची व्यवस्थित दैनंदिन देखभाल अथवा साफसफाई ठेवण्यात येत नसल्याने त्या सुविधा सुस्थितीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही गंभीर बाब असून पेट्रोलियम कंपनीच्या मार्गदर्शक सूचनेचे सर्रास उल्लंघन होत आहे.

तरी, चंद्रपूर जिल्ह्यातील संचालित असलेले पेट्रोलपंप या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांकरीता व नागरिकांकरीता पेट्रोलियम कंपनीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार स्वच्छ पिण्याचे पाणी, वाहनाकरींता हवा भरण्याची नि:शुल्क सुविधा व स्वच्छ प्रसाधनगृहे या किमान सुविधा आपल्या पेट्रोलपंप येथे तात्काळ उपलब्ध करून देण्यात याव्या व तसा फोटो अहवाल व यासोबत जोडलेले प्रमाणपत्रासह या कार्यालयास ३० मार्च २०२३ पर्यंत सादर करावा. तसेच सदर सुविधा नेहमीकरीता सुस्थितीत राहतील, याची खबरदारी घ्यावी. अन्यथा आपणास सदर जागेवर पेट्रोलपंप उभारणीस या कार्यालयाकडून देण्यात आलेले ना हरकत प्रमाणपत्र नियमानुसार रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल. याची संबंधित पेट्रोल पंप संचालकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी कळविले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos